
कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथील महिला सखी मंचतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परंतु समाज माध्यमांपासून दुर्लक्षित राहणाऱ्या घटकातील महिलांचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आयुष्याच्या वाटचालीत अनेक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक संकट, सामाजिक दबाव यावर मात करून स्वतःचा संसार फुलवणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत आपली छाप उमटवणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. नवरात्र उत्सवानिमित्त कुडाळच्या महिला सखी मंच तर्फे घेण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमात आपल्या दैनंदिन श्रमातून कुटुंब उभं करणाऱ्या तसेच मेहनतीने मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेणाऱ्या माता यांचा विशेष उल्लेख झाला. “स्वतःच्या श्रमातून स्वाभिमानाने जगणाऱ्या या महिला खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणास्थान आहेत”, असे गौरवोद्गार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.

कार्यक्रमात सत्कारार्थी महिलांनी आपले जीवनप्रवास कथन केले. कठीण परिस्थितीतील संघर्ष, मिळेल ते काम करून घर सांभाळणे, मुलांच्या शिक्षणासाठी त्याग, समाजाकडून मिळालेल्या उपेक्षेवर मात करून उभा केलेला जीवनप्रवास या कथनांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले.
महिला सखी मंचच्या या उपक्रमामुळे केवळ सन्मानच नव्हे, तर समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळाली. “ही माणसं कष्टातून उभी राहतात, म्हणूनच समाजाचा पाया अधिक मजबूत होतो”,अशा प्रतिक्रिया उपस्थित महिला वर्गात सुरु होती.

सन्मानार्थी महिलांना साड़ीसह ओटी देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला महिलानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या उपक्रमातून समाजातील श्रमजीवी, दुर्लक्षित महिलांचा सन्मान करण्याची परंपरा रूजवली जाणे हेच खरे ‘सखी मंच’चे यश असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रारंभी विश्व प्रार्थना,अभंग व भजन करण्यात आले. यावर्षी महिला सखी मंचच्या वतीने सन्मानित करण्यात आलेल्या श्रमदेवी महिला व त्यांचे कार्य करण्याचे क्षेत्र पुढीलप्रमाणे
(1) सौ सीमा कुंभार – शिक्षण विभाग
(२)रोहिणी किरवे – बचतगट
(३)उर्मिला जोशी – अंगणवाडी
(४)स्वाती जंगम – आरोग्य विभाग
(५)सुशीला जावळे – घर काम मदतनीस
(6)स्वाती शेवते – शेती विभाग
(७) सुरेखा पाटेळे – वाचन विभाग
(८)योजना सुर्वे – एसटी महामंडळ
(९) नुतन बोडरे – पोलीस विभाग
(१०)स्मिता माळवदे -पहिले पार्लर
(११) सुजाता म्हेत्रे -इंडस्ट्रियल वर्कर
प्रत्यक्षात हा समाजातील श्रमजीवी स्त्रियांच्या अदृश्य श्रमाचे दृश्यमान रूपांतर आहे. अशा कार्यक्रमांतून पुढच्या पिढ्यांना संदेश मिळतो की यश केवळ पदव्या, प्रसिद्धी वा संपत्तीने मोजले जात नाही; तर अडचणींवर मात करून इतरांसाठी आदर्श निर्माण करण्याने ते मोजले जाते.आजच्या भपकेबाज उत्सव संस्कृतीत ‘सखी महिला मंच’ने सुरू केलेली ही परंपरा उल्लेखनीय आहे. समाजात खरी समता, खरी स्त्रीशक्ती आणि खरी प्रेरणा निर्माण करायची असेल तर अशा सन्मानाच्या व्यासपीठांची गरज आहे.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उर्मिला कदम , व सुलभा लोखंडे यानी केले.विजेत्या महिला नी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होन्यासाठी सखी महिला ग्रुप ने सुंदर नियोजन केले होते.
.
