गौरी आगमन व विसर्जन बाबत शास्त्रोक्त माहिती.

सूर्यकांत जोशी कुडाळ – यावर्षी गणपती व गौरी सणावर भलेही कोरोनाचे सावट आहे. परंतु गणेश भक्तांच्या श्रद्धा आणि भक्तीला नेहमी प्रमाणेच उधाण आलेले आहे. योग्य काळजी खबरदारी घेऊन सर्वजण श्रींच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.त्यामुळे भक्तांच्या भक्तीमध्ये जोश आणि होश दोन्ही असल्याचे दिसून येत आहे.आपल्या सर्वांच्या घरी आता गणपती बाप्पा पाहुणे म्हणून विराजमान झाले आहेत. सर्वानी गणपती बाप्पांचे यथाविधी स्वागत केले. आता बाप्पांची दररोज पूजा, आरती व स्तोत्र सुमनांनी स्तुती करून त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून या पाहुण्यांना संतुष्ट करण्याची लगभग प्रत्येक घरात सुरू आहे.एकूणच सर्वत्र धार्मिक ,पवित्र व मन प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. आता गणपती बाप्पा पाहुन चार घेत असताना महिला वर्गाची गौरी आगमनासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना थोडे शास्त्रोक्त मार्गदर्शन होणंही तितकेच महत्वाचे आहे.
यावर्षी भाद्रपद शुद्ध ।।७।।मंगळवारी दुपारी १.५९ नंतर गौरी आवाहन करणेचे आहे. बुधवारी दुर्गाष्टमी, गौरी पूजन दुपारी १.०४ वाजे पर्यंत करावे. गुरूवारी अदुख नवमी आहे . गौरी विसर्जन व दोरे घेणे दुपारी १२.३७ नंतर करावे. यावर्षी कोरोनाच्या संभाव्य संसर्गामुळे महिलांनी हळदी कुंकू घेण्यासाठी गावभर फिरु नये.आपल्या घरातील अथवा शेजारी अशा पाच जणींतच हळदी कुंकू देणे उचीत ठरेल.
गौरीसणाची प्रथा वआख्यायिका
गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात.
त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते. या दिवशी सर्व माहेरवाशिन एकत्र येऊन गौरीची पूजा अर्चा करतात. यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते. दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.
कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.
गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढेलाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. तसेच काही ठिकाणी म्हणजे कोकणात गौरीला तिखटाचे जेवण दिले जाते. तसेच त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.
तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.
सूर्यकांत जोशी कुडाळ
९१४६८९७०६९
Khup chan👌