गणपती विसर्जना वर कोरोना चे सावट तरीही भक्ती भावाने श्रींना निरोप
एकूण – ७६८, बळी २१, डिस्चार्ज ५९६,अँक्टिव्ह १५१
आज २३ जण कोरोना बाधित
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तेवीस जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मेढा येथील २२ व भणंग येथील एकाचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. दरम्यान जावली तालुक्यातील म्हाते खूर्द येथील ४७ वर्षीय पुरुषाचा दोन दिवसांपूर्वी कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. परंतू याची नोंद सातारा येथे झाली आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिपक पवार यांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.त्यांच्या वर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्बेत आता बरी आहे.लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे त्यांनी सांगितले.
ढोलताशां शिवाय भक्तीभावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप ;
दहा दिवसांसाठी पाहुणे आलेल्या श्री गणपती बाप्पांना भक्तीभावाने आज निरोप देण्यात आला.कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत गणेश भक्तांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले.यावर्षी ढोलताशांचा दणदणाट नव्हता मात्र गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले होते.
दरवर्षी गणपती चे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत विविध प्रकारच्या वाद्यांची रेलचेल असते.शासनाने डॉल्बीला बंदी घातल्या पासून ढोलताशापथकांचा भाव चांगलाच वधारला होता. काही गावातील तरुणांनी एकत्र येत आपल्या हक्काचे ढोलताशा पथक तयार केले आहेत. वाजत गाजत बाप्पांना निरोप देण्याचा उत्साह आणि आनंदाला यावर्षी मर्यादा होत्या. परंतु भक्ती आणि श्रद्धेला मात्र उधाण आले होते.
पावसाळा सुरू असल्याने ग्रामीण भागात नदी आणि ओढ्यांचे वाहत्या पाण्याचे श्रोत मुबलक प्रमाणात आहेत. तसेच अनेक पाझर तलाव , धरणे भरलेली असल्याने गणपती मूर्ती विसर्जना साठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज भासली नाही. तसेच यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा प्रशासनाच्या आदेशानुसार छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापणा केली होती . गर्दी टाळण्यासाठी यावर्षी देखावे, व सांस्कृतिक कार्यक्रमाना बगल देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.