HomeTop Newsगणेशमूर्ती विक्री न झाल्याने कुंभार समाज आर्थिक अडचणीत

गणेशमूर्ती विक्री न झाल्याने कुंभार समाज आर्थिक अडचणीत

कोरोना मुळे कुडाळ ठप्प

गणेशमूर्ती विक्री न झाल्याने कुंभार समाज आर्थिक अडचणीत

सूर्यकांत जोशी कुडाळ – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कुडाळच्या बाजारपेठेत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.त्यामुळे अनेक छोटेमोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.याबरोबरच कुडाळ येथे कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाने पारंपारिक व्यवसाय आज पर्यंत सांभाळला असून गेले चार महिने सहकुटूंब काबाडकष्ट करुन बनवलेल्या मूर्ती यावर्षी विकल्या न गेल्याने हा समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे.

         साठगाव खोरे अशी कुडाळ विभागाची ओळख आहे. या विभागातील छोट्या मोठ्या गावांची नाळ बाजारपेठेच्या माध्यमातून कुडाळशी जोडली गेली आहे.कुडाळ मध्ये असणारा कुंभार समाज या विभागातील लोकांशी बलुतेदारीने पूर्वांपार सेवा देत आहे. घटस्थापना, संक्रांत यासणांसाठी घट व संक्राती तसेच बेंदुरसणासाठी बैल ,या बरोबरच अंत्यविधी साठी लागणारे मडकी अशा सेवा हा समाज बलुतेदारीची बांधिलकी म्हणून वर्षानुवर्षे देत आहे. याबरोबरच येथील कुंभार समाजाची ओळख उत्कृष्ट मूर्तीकार अशी असून गणपतीच्या विविध कलागुणांचा अविश्कार असलेल्या मूर्ती हा समाज बनवत असतो.वर्षांत केवळ गणेशमूर्ती विक्री च्या माध्यमातून या समाजाला चांगली आर्थिक आवक होण्याची अपेक्षा असते.

         यावर्षी ही नेहमी प्रमाणे गेल्या चार महिन्यापासून हा समाज सहकुटुंब आपले प्राण ओतून गणेशमूर्ती बनवत होता.बनवलेल्या मूर्तीची गणेशोत्सवा पूर्वी दोन दिवसात विक्री होत असते. परंतु यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वीच कुडाळ मध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे बाजारपेठ बंद राहिल्याने परिसरातील गावचे गणपती खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक आले नाहीत.तसेच  काही गावात अन्य लोक बाहेरून तयार मूर्ती आणून विक्री करत आहेत त्याचा परिणाम कुंभार समाजाने बनवलेल्या मूर्तीच्या विक्री वर होत आहे. व्यवसाय म्हणून जरी कोणीही गणपती मूर्ती विकू शकत असेल परंतु आज पर्यंत कुंभार समाजाने सांभाळलेली सामाजिक बांधिलकी सुद्धा तितकीच महत्वाची आहे .याचेही भान समाजाने ठेवावी अशी अपेक्षा कुंभार समाजाकडुन व्यक्त होत आहे.

          यावर्षी   जवळपास पन्नास टक्के गणेशमूर्ती शिल्लक राहिल्याने मूर्ती बनवण्यासाठी लागणारा खर्चही न निघाल्याने कुंभार समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे.या मूर्तीकारांच्या कलेची तसेच बलुतेदारी च्या परंपरेची जाणीव ठेवून जनतेने कुंभार समाजाने बनवलेल्या मूर्तीच खरेदी केल्यास मूर्तींची अपेक्षित विक्री होऊन या  समाजाला पाठबळ मिळणार आहे.

          शिल्लक गणेश मूर्तींबरोबरच अनेक दुकानदारांनी या उत्सवात सजावटीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री साठी आणले होते. परंतू दुकाने बंद राहिल्याने माल तसाच शिल्लक राहिल्याने हे भांडवल आता वर्षभर गुंतुन पडणार आहे.एकूण कोरोनामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular