Thursday, February 19, 2026
HomeTop Newsछत्रपतींची राजधानी शिवजयंतीने बनली  शिवमय: सातारा जिल्ह्यात शिवजयंती विविध उपक्रमांनी संपन्न

छत्रपतींची राजधानी शिवजयंतीने बनली  शिवमय: सातारा जिल्ह्यात शिवजयंती विविध उपक्रमांनी संपन्न


(अजित जगताप )
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपतींची राजधानी शिवजयंती निमित्त शिवमय दिसली. ढोल, ताशा, झांज, लेझीम, दांडपट्टा, मावळे आणि शिवकालीन इतिहास साक्ष देणाऱ्या भगव्या पताका आणि जय भवानी… जय शिवराय… चा जयघोष यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा साडेतीनशे वर्षांनी छत्रपतींची राजधानी शिवमय बनली आहे.
माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातही जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेचे चांगल्या पद्धतीने आयोजन झाले होते. स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद सि.ओ. याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह शेकडो शिवभक्त आणि जिल्हा प्रशासन अधिकारी कर्मचारी या मेगा पदयात्रेत सामील झाले होते. सातारा शहरात ठिक ठिकाणी रांगोळ्या व चौका चौकात शिवकालीन खेळांचे प्रदर्शन करण्यात आले होते .
    सातारा शहरात सकाळी सात वाजल्यापासून या पदयात्रेत पोवाडे, लेझीम पथक, झांजपथक, सांस्कृतिक कार्यक्रम, घोडेस्वार, वासुदेव, पोतराज, मावळ्यांच्या वेशात मुले, नागरिक, सामाजिक संस्था, असे बारा हजारांहून अधिक शिवप्रेमीनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभुराज देसाई ,
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिहराजे भोसले , ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे, यांच्यासह मान्यवरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर अनेकांनी भेटी देऊन या दोन्ही नेत्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.


         या कार्यक्रमामध्ये शासनाच्या वतीने ‘युवा शक्ती करेगी भारत का निर्माण’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा व विविध देखाव्याद्वारे स्वराज्याच्या स्मृती जागवत अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवगर्जनेने उपस्थितांमध्ये चैतन्य फुलविले होते. संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रातून विविध ठिकाणी आणलेल्या शिवज्योतीचेही स्वागत करण्यात आले. सातारा नगरपालिकेच्या वतीने अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य दिव्य कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगराध्यक्ष डी  जे. बनकर, नगरपालिका मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह नगरसेवक- नगरसेविका व सातारकर मान्यवर शिवप्रेमी व विविध प्रसार मध्यमाचे पत्रकार उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या बद्दल असणारे प्रेम व अभिमान बाल शिवाजीच्या रूपात पाहण्यास मिळाले. त्याच्या सर्वत्र कौतुक होत आहे.



____________________________________________

  फोटो — छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात शिवजयंती साजरी करताना मान्यवर (छाया– निनाद जगताप ,सातारा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page