
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील डोंगर कपारीत डौलाने डोलणारी रब्बी पिके रानडुककरांचे कळप भुईसपाट करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाने या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
दिवसेंदिवस लोकांच्या राहणीमानात बदल झाला आहे. घरातील चुलीची जागा गँस शेगडीने घेतली आहे. त्यामुळे डोगर दर्यातून होणारी वृक्षतोड कमी झाल्याने जंगल तयार होउ लागले आहे. त्याच बरोबर वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जावलीच्या डोंगर दर्यात पट्टेरी वाघ,बिबटे, रानगवे,रानडुककर,लांडगा,कोल्हे इत्यादी जंगली प्राण्यांची संख्या वाढली आहे. तसा या प्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे.
तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. त्यानंतर रब्बी हंगामात पिकांना पोषक हवामान असल्याने ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकांची जोमाने वाढ झाली आहे. तर उस,हळद,आले इत्यादी बागायती पिके सुद्धा चांगली आहेत.या पिकांना मोला महागाईची खते घातली जात आहे. तसेच जीवधोक्यात घालून रात्रीच्या वेळी शेतकरी पिकांना पाणी देत आहेत.आता ही पिके हाता तोंडाशी येत असतानाच जंगली श्वापदे उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. यंदा ही पिके चांगली असल्याने शेतकरी खुश आहेत.हवामान ही चांगले आहे, पण कोणत्या ना कोणत्या संकटाला ला शेतकऱ्यांना नेहमीच सामोरे जावे लागत असते. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आखाडे, हुमगांव, सोमर्डी,म्हसवे, बेलावडे यासह डोंगर विभागातील गावच्या शेतकर्यांनी केली आहे.