; शिकाऊ अधिकार्यांच्या अनुभव शुन्यतेने तालुका लाॅकडाऊन:
कुडाळ ६. जावली तालुक्यात कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्ण दर केवळ २.९७ टक्के आहे.तर रिकव्हरी दर ९५ टक्के आहे.असे असताना तालुक्यात लाॅकडाऊन करुन लोकांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटणार्या प्रशासनाच्या कारभाराबाबत तालुक्यातील व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जावली तालुक्याला लाॅकडाऊन मधून वगळावे अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्ष आणि व्यावसायिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांना देण्यात आले.
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत.अनेक व्यवसाय सिझनल आहेत.त्यामुळे हे व्यवसाय पावसाळ्यात पूर्ण पुणे बंद असतात.लाॅकडाऊन मुळें लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद रहात असल्याने कोरोना ऐवजी उपासमारीने मरण्याची भीती अधिक वाटते.अनेकांचे संसार उद्धवस्त झाले.व्यवसाय लयाला गेले. तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने लाॅकडाऊन लादू नये अशी मागणी सर्वव्यापारी वर्गातून केली जात आहे. सर्वसामान्य जनतेचे दुःख गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्रशासकीय अधिकार्यांना समजणार नाही.जिल्हा प्रशासन सुद्धा सरसकट सर्व तालुक्यांसाठी एकच निकष लावून जिल्ह्यात लाॅकडाऊन करुन जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरत आहे.
वास्तविक तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देऊन तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक होते.त्यासाठी समाजाभिमुख निर्णय घेणारा अनुभवी प्रशासकीय अधिकारी असणे आवश्यक होते.तालुक्यातील जनता शांत संयमी व सोशिक आहे.त्यामुळे प्रशासनाला कारभारासाठी येथील जमीन मऊ भुसभुशीत वाटत असल्याने कोणतंही शिकाऊ अन् विकाऊ चोपण येथील जमीन थोपटायला पाठवल जात.आणि त्यात तालुक्यातील सर्वसामान्य जनता भरडली जाते.हा नेहमीच प्रत्यय येथील जनतेला येत असतो.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी लाभल्याने तालुक्यातील जनतेला काहिसा दिलासा मिळाला आहे.हे अधिकारी समाजाच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करत असल्याचा अनेकदा प्रत्यय येतो.
तालुक्यात लसिकरणाचा बोजवारा ; अनेक लसिकरण केंद्रांवर वादावादी
गेले सहा महिने जावली तालुक्यातील प्रशासन एका अनुभव शुन्य शिकाऊ अधिकार्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यात साथ रोग नियंत्रणा बरोबरच लसीकरणाचाही बोजवारा उडाला आहे.लोकांनी गर्दी करु नये असे उपदेशाचे डोस देणारे प्रशासन लसिकरण केंद्रावर मात्र गाव जमा करत आहे.लोक सकाळी उजाडल्या पासून रांगा लावत आहेत.लस किती येणार,कोणती येणार,पहिला डोस किती,दुसरा डोस किती याचा प्रशासनालाही थांगपत्ता नसतो.लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहता ही लसीकरण केंद्रेच कोरोना संसर्ग केंद्र बनतील अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे. येत्या सहा महिन्यांत शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.सर्वांना लस मिळणार हे सत्य आहे.मग हे दररोजचे “घावल त्याला पावल ” असं सांगून गर्दी जमवण्याचे कारण काय.जेवढी लस येणार आहे तेवढ्याच लोकांना लसिकरण केंद्रावर टप्प्याने बोलावणे आवश्यक आहे.अगदी प्रत्येक आळी,वाॅर्ड असे नियोजन होणे आवश्यक आहे.एकीकडे संचारबंदीचा आदेश काढायचा अन् दुसरीकडे अख्खा गावाला लसिकरण केंद्रावर तासनतास नंबर लावण्यासाठी ताटकळत उभे करायचे.लोकांची अशी ससे होळपट करण्यात प्रशासनाला असुरी आनंद मिळतो की काय असाच प्रश्न पडतो.अनेक लसिकरण केंद्रांवर दररोज भांडण तंटे , वादावादी होत आहे.त्याकडे हे प्रशासन सोयिस्कर दुर्लक्ष करत आहे.

