जावली तालुक्याचा अॅक्टिव्ह रुग्ण दर पाच टक्क्यांपेक्षा कमी ; तालुक्याचा पहिल्या गटात समावेश करुन सर्व दुकाने सुरू करण्याची व्यापार्यांची मागणी.
सूर्यकांत जोशी कुडाळ – दि.११ प्रशासनाच्या प्रयत्नांना जावलीतील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची वाढ नियंत्रणात आली आहे.तालुक्याचा रिकव्हरी दर ९३.९६ टक्के झाला असून अॅक्टिव्ह रुग्ण दर ३.५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.त्यामुळे शासनाच्या नव्या नियमानुसार जिल्ह्याच्या परिस्थिती नुसार अन् लाॅकची अंमलबजावणी केली जात असली तरीही पावसाळा असल्याने जावली तालुक्याची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा पहिल्या गटात समावेश करुन सर्वं व्यवसाय कोरोनाचे नियम पाळून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता व व्यापारी वर्गातून केली जात आहे.
आता पावसाळा सुरू झाला आहे.शेतीच्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे.शेतकर्यांना अनेक वस्तू हार्डवेअर, इलेक्ट्रीकल दुकानातून घ्यावा लागत आहेत. पावसाळी चप्पल ,बूट घ्यावें लागत आहेत.शाळा काॅलेजची नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने स्टेशनरी व जनरल स्टोअर्स मधील अनेक वस्तू खरेदी कराव्या लागतात.याही पेक्षा अनेक व्यावसायिकांच्या उपजिविका या व्यवसायांवर आहेत.त्यामुळे आता सर्व व्यवसाय नियम पाळून सुरु करणे आवश्यक आहे.
ग्रामविलगीकरणाच्या दट्ट्या मुळे कोरोना नियंत्रणात
ग्रामविलगीकरणाच्या दट्ट्या मुळे घरी क्वारंटाईंन झालेलेही चिडीचूप घरात बसले.परिणामी संसर्ग साखळी तोडणे शक्य झाले आहे.आता लोकांनी कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
लोकांनी कोरोना पासून स्वतः चे संरक्षण करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.या पंधरा दिवसांत तालुका प्रशासनातील उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते व स्थानिक दक्षता कमिट्यांनी कोरोना बाधितांना ग्रामविलगीकरणात थांबवण्यासाठी कठोर निर्णय घेतले.परिणामी या आठवड्यात तालुक्यात दररोज शंभरहून अधिक वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा २५ च्या आत रोखणे शक्य झाले. ग्रामविलगीकरणाचे दृश्य परिणाम या आठवड्यात दिसून आले.