Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पाच हजार मि.मी.कमी पाऊस

जावली तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पाच हजार मि.मी.कमी पाऊस

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पाच हजार मि.मी.कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ सप्टेंबर अखेर १३९७८.९०  मि.मी.एवढा झाला होता. यावर्षी याच तारखेपर्यंत ८८६४.१९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.अशी माहिती जावली तहसीलदार कार्यालयाकडुन प्राप्त झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात ५११३.७०  मि.मी.कमी पाऊस झाला आहे. तर सरासरी च्या तुलनेत ८५२.४०  मिमी.कमी पावसाची नोंद झाली आहे.

     यावर्षी फक्त कुडाळ मंडलात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७७.३  मि.मी अधिक पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात यावर्षी मंडल निहाय पडलेला पाऊस व गत वर्षीचा कंसात दिलेली पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये पुढील प्रमाणे – मेढा – १३०२.११(२८७८), आनेवाडी – ७५८.१२(९५०.१०),कुडाळ -११२२ .००(८४४.७०), बामणोली ३०२६.७४ (४४१०.९०), केळघर १४५०.०२ (३०२७.७०),करहर १२०५.२०(१८६६.४०) अशी आहे.यावर्षी तालुक्यात आज अखेर सरासरी १४७७.३७ मि.मी.पाऊस झाला असून गतवर्षी २३२९.७७  मिमी.एवढा पाऊस झाला होता.

          यावर्षी पाऊस कमी झाला असला तरीही कण्हेर धरण तसेच छोटेमोठे पाझर तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यापाण्याचा वापर जपून करावा लागेल. सरताळे ते कापसेवाडी दरम्यान असणारा पाझर तलाव गेल्यावर्षी आँगष्ट महिन्यातच भरून वाहत होता. यावर्षी हा तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला आहे.  

           तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडुन सुद्धा दरवर्षी प्रमाणेच डोंगर उतारावरील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 

              तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरीही पावसाचे पाणी अडवून ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. कण्हेर धरणाने जावली तालुक्यातील क्षेत्र बाधित झाले. तसेच तालुक्यात पडलेल्या पावसाने हे धरण भरते. परंतू या धरणातील पाण्याचा  मात्र तालुक्याला उपयोग होत नाही. तालुक्यातील कुडाळ विभागाची तहान भागवणारे कुडाळी प्रकल्पांतर्गत होऊ घातलेल्या महु व हातगेघर धरणाचे काम गेली वीस वर्षे सुरू आहे. तर मेढा विभागाला वरदान ठरणारे बोंडारवाडी धरण अजुन कागदावर आहे. भरपूर पाऊस पडुन सुद्धा पाण्यासाठी लोकांना करावी लागणारी वनवन म्हणजे ‘दैवदेते आणि कर्म नेहते’ अशीच आहे.

          यावर्षी जोरदार पाऊस न पडल्याने पाऊस कमी पडला असल्याचे दिसत आहे. परंतु गेले तीन महिने सलग रीमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतातील अंतर मशागती करता आल्या नाहीत. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तन वाढले आहेत. त्याचा परिणाम खरीप उत्पादनावर झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.

            यावर्षीचे पावसाळा आता अखेरच्या टप्प्यात आला असून आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस हा बेभरोसेच समजला जातो.हा पाऊस वळीव स्वरुपात मोठ्या प्रमाणात पडतो. बहुदा पिकांचे तसेच स्थावर मिळकतीचे  नुकसान करणारा ठरतो. आता खरीप हंगामातील भुईमूग घेवडा, सोयाबीन व कडधान्ये ही पीके काढणीच्या अवस्थेत येत आहेत. अशावेळी वळीवाचा पाऊस हानिकारक ठरतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page