

सूर्यकांत जोशी | कुडाळ
जावली तालुक्यातील सायघर, घोटेघर, मार्ली आणि रामवाडी या चार गावांत दिवसाढवळ्या झालेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास आणि पंचनामा करण्यास मेढा पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या घटनांनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्याचा दावा केला असताना, अद्यापही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समोर आले आहे. चोरी झालेल्या घरांची पाहणी, पंचनामा अथवा प्राथमिक तपासासाठीही पोलीस वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप संबंधित गावांतील नागरिकांनी केला आहे.
या संदर्भात मंत्रालयीन सचिव आर. के. धनावडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जर दिवसाढवळ्या घरफोड्या होऊनही पोलिसांकडून कोणतीही तत्पर कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी, “अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगावणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये,” असे आवाहन केले आहे.
मात्र, या दाव्यालाही ग्रामस्थांनी आणि आर. के. धनावडे यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. “घटनास्थळी कोणताही पोलीस अधिकारी आलेला नाही. आम्ही वस्तुस्थिती मांडत आहोत, चुकीची माहिती देत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, या चारही गावांतील नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यात गेल्याचा दावा करत आहेत. मात्र, चोरीत मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे कारण पुढे करून तक्रार स्वीकारण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
घरफोडीनंतर चोरट्यांनी कपाटे फोडून घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमधून घरफोडीची गंभीरता स्पष्ट होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली गेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
जावली तालुक्यातील विविध सोशल मीडिया गटांमध्ये पोलीस, महसूल व इतर शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत एवढ्या गंभीर प्रकाराची माहिती समोर येऊनही संबंधित विभागांनी स्वतःहून (सुओ मोटू) कारवाई न केल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“चोरट्यांनी घरात घुसून कपाटे फोडली, वस्तूंची नासधूस केली, तरीही प्रशासनाला जाग येत नसेल तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
जावली तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त असल्याची भावना व्यक्त होत असून, या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच इतर लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थितीची चौकशी करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
ठळक प्रश्न
चार गावांत घरफोड्या होऊनही गुन्हा नोंद का नाही?
तक्रार देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना परत का पाठवले?
घटनास्थळी पोलीस गेले की नाही?
सोशल मीडियावर माहिती असूनही प्रशासनाने स्वतःहून दखल का घेतली नाही?
नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर?
जावली तालुक्यातील या प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करणे गरजेचे बनले आहे.
