

*सौरभ शिंदे सभापती पदासाठी प्रबळ दावेदार*
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुका पंचायत समितीच्या सोमवारी होणाऱ्या सभापती निवडीकडे आता तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही भाजपा तीन शिवसेना दोन व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. स्पष्ट बहुमता अभावी जावली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड अत्यंत रंजक अवस्थेत मध्ये पोहोचली आहे.
आता पंचायत समितीचे सत्ता काबीज करण्यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय डावपेच आखतात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जावली तालुक्याच्या राजकीय पटलावर वसंतराव मानकुमरे भाजपाचा सभापती होण्यासाठी काय खेळी करणार या बरोबरच मोठ्या जिद्दीने व मेहनतीने भाजपचा बालेकिल्ला असणारा कुसुंबी गट दोन गणा सह काबीज करणाऱ्या शिवसेना नेते अंकुश कदम यांची भूमिका सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वरिष्ठ पातळीवर महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवावी असा निर्णय झाल्यास जावली पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपाचा दावा भक्कम होईल. परंतु निवडणुकीप्रमाणेच विरोधी आघाडी कायम राहिल्यास तीन-तीन असे समान बलावर होणार असल्यामुळे ईश्वरी चिठ्ठीवर सभापती निवड अवलंबून असणार आहे.
या निवडणुकीत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे- कुडाळ गण,सौ.चारुशीला पवार- सायगाव गण , गोरख महाडिक- खर्शी बारामुरे गण हे तीन सदस्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आले आहेत. म्हसवे गणातून सौ शिल्पा शिंदे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडून आल्या आहेत. कुसुंबी गणातून सौ सुनीता दूंदळे व आंबेघर तर्फ मेढा या गणातून अतीश कदम हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत.
जर राजकीय तडजोडी झाल्या तर यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती पद भोगल्याने असणाऱ्या अनुभवाच्या जोरावर सौरभ शिंदे यांना सभापती पदाचे संधी मिळू शकते किंबहुना ते या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.परंतु जावली पंचायत समितीचा पूर्व इतिहास पाहता आजपर्यंत उपसभापती पद भोगणाऱ्या नेतृत्वाला पुढे वरिष्ठ नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.त्यामुळे ही परंपरा सौरभ शिंदे मोडीत काढणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.