जावली बाजार समितीवर बिनविरोध शिंदेशाही
जयदीप शिंदे सभापती, हेमंत शिंदे उपसभापती
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांची तर उप सभापती आ शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जावली बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील यांनी एकत्र पॅनल उभे केले होते.त्या विरोधात माजी आमदार सदाशिव सपकाळ व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पॅनल उभे केले होते. या निवडणुकीत तीन आमदारांच्या पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला होता. त्या नंतर आज सभापती व उप सभापती निवडी साठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभापती पदासाठी राजेंद्र भिलारे यांनी जयदीप शिंदे (सोनगाव )यांचे नाव सूचित केले. त्याला मच्छिन्द्र मुळीक यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापती पदासाठी हेमंत शिंदे( कुडाळ )यांचे नाव बुवासाहेब पिसाळ यांनी सूचित केले त्याला मनिष फरांदे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सभापती पदी जयदीप शिंदे व उपसभापती पदी हेमंत शिंदे यांची निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नानासाहेब रूपनवरकर यांनी जाहीर केले.
जावली बाजार समितीला सर्वतोपारी सहकार्य -आ. शिवेंद्रसिंह राजें
** या पुढील काळात जावली बाजार समिती ची आर्थिक प्रगती होण्यासाठी संचालक मंडळाला सर्वतोपारी सहकार्य करणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमालाची खरेदी विक्री झाल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी यावेळी केले.**
विश्वास सार्थ ठरवणार – जयदीप शिंदे
आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या प्रगतीसाठी यापुढील काळात काम करून सर्व मतदार व शेतकरी बंधू, व संचालक मंडळाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जयदीप शिंदे यांनी निवडी नंतर बोलताना दिली.
सभापती जयदीप शिंदे व उपसभापती हेमंत शिंदे यांचे आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले,जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम यांनी अभिनंदन केले.
