सूर्यकांत जोशी कुडाळ –
जावली व वाई तालुक्याला जोडणाऱ्या हुमगाव बावधन वाई या रस्त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता हुमगाव व करहर विभागातील शेतकऱ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. गेले पंचवीस ते तीस वर्ष हा रस्ता होण्यासाठी जनतेतून जोरदार मागणी होत होती. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा प्रश्न लवकर सुटत नसलेने या विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण विरहित एकत्र येऊन लढा उभारला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते सयाजीराव शिंदे,ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे, अशोक सरकाळे यांच्यासह सुमारे 200 जणांनी एकत्र येत व्हाट्सअप ग्रुप बनवला होता.या कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला कार्यवाही करणे भाग पडले. जावली तालुक्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी सुद्धा नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना हा रस्ता तातडीने व्हावा अशी जोरदार मागणी केली होती. आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता अत्यंत गरजेचा असल्याचे या विभागातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव घेऊन बाबाराजेंकडे देण्यात आले होते. या रस्त्याच्या बाबतीत जनतेच्या असणाऱ्या भावना आणि गरज ओळखून सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालणार असल्याचे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते आणि त्यांनी प्रशासनाला हे काम तातडीने मार्गी लावण्याची दिलेले आदेश दिले होते . प्रयत्न व जबाबदारी कोणाचीही असो परंतु अनेक वर्षापासून रेंगाळलेला हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागला हे भावी पिढ्यांच्या दळणवळणाच्या व प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णया नुसार सातारा जिल्ह्यातील जावळी व वाई तालुक्यातील काही महत्त्वाच्या ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांच्या प्रस्तावावर तसेच जिल्हा परिषद, सातारा यांच्या ठरावाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित रस्त्यांवरील वाढता वाहतूक प्रवाह, लोकसंख्या व भौगोलिक गरजांचा विचार करून ही दर्जोन्नती करण्यात आली असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयानुसार जावळी व वाई तालुक्यातील विविध ग्रामीण मार्गांची एकूण १२.८०० कि.मी. लांबी प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये आखाडे- हुमगाव -वाघजाईदेवी- झगडे वस्ती – बावधन बगाड रस्ता (ता. जावळी व वाई) या मार्गाचा समावेश असून संबंधित ग्रामीण मार्ग क्रमांक ५५, ९७, ९६, १०७ व १०९ या टप्प्यांतील रस्ते आता ‘प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ५९-५१’ म्हणून ओळखले जाणार आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांच्या एकूण लांबीमध्ये वाढ होणार आहे. रस्ते विकास योजना २००१-२०२१ अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी १२.८०० कि.मी.ने वाढणार असून ग्रामीण मार्गांची लांबी त्यानुसार कमी होणार आहे. यामुळे संबंधित मार्गांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व निधी उपलब्धतेस प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या दर्जोन्नतीस काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. नव्याने कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक मंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच भूसंपादनासंदर्भातील कोणत्याही तक्रारी अथवा न्यायप्रविष्ट प्रकरणांची जबाबदारी संबंधित विभागांवर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे जावळी व वाई तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना वाई शहर जवळ येत असल्याने बाजारपेठ उपलब्ध होऊन स्थानिक विकासाला चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
जावली व वाई तालुक्याला जोडणाऱ्या हुमगाव ते बावधन रस्त्याला प्रशासकीय मंजुरी : जनतेच्या अभूतपूर्व लढ्याला यश : ना. शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला आदेश.
- Advertisment -