एकूण – ५४३, बळी १९, डिस्चार्ज ४३८, अँक्टिव्ह ८६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज दिवसभरात ११ कोरोना बाधितांची भर पडली. यामध्ये कुडाळ ५,मोरघर १,खर्शी कुडाळ १,भणंग १, सोमर्डी १ ,गवडी १, महिगाव १, यांचा समावेश आहे.
दरम्यान सोमवारी सरताळे गणेशवाडी येथील अंगणवाडी सेविकेचा कोरोना मुळे बळी गेला होता. आज तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी गणेशवाडी येथे भेट देऊन संबंधित महिलेच्या नातेवाईकांची भेट घेतली . तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना केल्या. संबंधित अंगणवाडी सेविकेच्या संपर्कातील ५७ लोकांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
तहसीलदार शरदपाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी कुडाळला भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या.कुडाळ येथे बाजारपेठेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ बुधवार पासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यापारी संघटनेने घेतला आहे.
तालुक्यात गेल्या आठवड्यात काहीसा नियंत्रणात आलेल्या कोरोनाने जावली तालुक्यात या आठवड्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून दररोज नवनवीन गावात कोरोनाचा शिरकाव होत आहे. गणेशोत्सव दोन तीन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कोरोनाने अक्षरशः थैमान सुरू केले आहे.
कोरोना योद्धाच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी लवकरच प्रस्ताव
गणेशवाडी – सरताळे येथील अंगणवाडी सेविकेचा कोरोना मुळे बळी गेला आहे ही अत्यंत दुखद व दुर्दैवी घटना आहे. शासन नियमानुसार संबंधित कोरोना योध्यांच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावलीतील तब्बल सात गावांना आज कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ बाजारपेठेत कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ने एस्.टी स्टँड ते डॉ. गायकवाड यांचा दवाखाना दरम्यान कन्टेंमेंट झोन करण्यात आला आहे .तसेच दरे बु.,गणेशवाडी, गवडी, बिभवी,भणंग, महिगांव येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील सात गावात कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
कोरोना योध्याच्या बलिदानाने जावली तालुका गहिवरला
आपल्या गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सरताळे – गणेशवाडी येथील एका अंगणवाडी सेविकेचा सोमवारी कोरोनाने बळी घेतला.अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि आपल्या कर्तव्याशी अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिलेल्या वयाच्या पन्नाशीतील या कोरोना योध्याच्या बलिदानाने सरताळे – गणेशवाडी सह संपूर्ण जावली तालुका गहिवरला.
कोरोना विरुद्धच्या लढाईत अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका करत असलेल्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या सर्व कोरोना योध्यांना तमाम जावलीकरांच्या वतीने मानाचा मुजरा.
कोरोना महामारी पासून सर्वसामान्य जनतेचा बचाव व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार तर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. या महामारी विरुद्धच्या लढाईत शासकीय कर्मचाऱ्यां बरोबरच विविध घटकांना सामावून घेतले जात आहे.या लढाईत डाँक्टरांप्रमाणेच अंगणवाडी व आशा सेविकांचे कार्य फ्रंटफुटवर राहिले आहे.
गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक गावात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांच्या नोंदी करणे,त्याच बरोबर त्यांना कोणते आजार आहेत का, कुणाला कोरोनाची लक्षणे आहेत का.प्रत्येक घरात असणाऱ्या वयोवृद्ध, गरोदर माता, लहान मुलं यांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी व आशा सेविका अविश्रांत पार पाडत आहेत.
या लढाईत प्रत्येक घटक आपली जबाबदारी सांभाळत आहे. परंतु कोणत्याही सुरक्षित उपाय योजनांशिवाय अंगणवाडी सेविकांना लोकांच्या समोरच नव्हे तर थेट घरात जाऊन सर्व्हे करावा लागत आहे. दारात गेल्यावर कोणी आदराने बोलेल की कोणी खोटी माहिती देऊन पिटाळायला पहाणार, तर कोणाला विचारले म्हणून राग ही येणार असे अनेक अनुभव आले तरीही हे योध्ये आजही आपले कर्तव्य न डगमगता पार पाडत आहेत.