Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीतील शेतकऱ्यांच्या जीवाला वन्य प्राण्यांपासून धोका; दिवसा वीजपुरवठ्याची तातडीची गरजभाजप व जनजागर...

जावलीतील शेतकऱ्यांच्या जीवाला वन्य प्राण्यांपासून धोका; दिवसा वीजपुरवठ्याची तातडीची गरज
भाजप व जनजागर प्रतिष्ठाणची प्रशासनाकडे ठाम मागणी        *जावली भाजपा  अंतर्गत वादाच्या विळख्यात?*



सूर्यकांत जोशी कुडाळ
जावली तालुक्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग आज भीतीच्या सावटाखाली शेती करत आहे. एकीकडे कडाक्याची थंडी, तर दुसरीकडे बिबट्याचा वाढता वावर यामुळे रात्री शेतात जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. अशा परिस्थितीत शेती पंपांना केवळ रात्रीच वीजपुरवठा देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा जावली तालुका व जनजागर प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसील कार्यालय, मेढा येथे निवेदन सादर करून शेती पंपांना दिवसा विजपुरवठा देण्यात यावा तसेच ज्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत, अशा शेतकऱ्यांना तात्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे अशी ठाम व रास्त मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या जावली तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या अंधारात शेतात जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत तहसीलदार प्रवीण मुगदल यांनी महावितरण मेढा उपविभागीय अभियंता यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे.
दरम्यान, या विषयावर धोरणात्मक व कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी जावली भाजपाचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या निवेदन प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुतार, माजी उपाध्यक्ष भानुदास ओंबासपकाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली सावंत, नामदेव क्षीरसागर, दत्ता शिंदे, सरचिटणीस अंकुश बेलोशे, ज्ञानेश्वर गोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आज शेतकरी केवळ पिकांसाठी नाही, तर स्वतःच्या जीवासाठीही लढत आहे. प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन दिवसा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांचा हक्क म्हणून तातडीने अमलात आणावा, अशी ठाम अपेक्षा व्यक्त होत आहे.

जावलीत भाजपाला अंतर्गत वादाचा विळखा?
शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या वन्यजीवांचा मानवी वस्तीवर होणारे हल्ले आणि शेतीसाठी आवश्यक दिवसा वीज या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते एकीकडे तहसीलदारांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडत आहेत परंतु यामध्ये भाजपच्या व्यासपीठावर सातत्याने मिरवणारे पदाधिकारी, वरिष्ठ नेते अथवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित दिसत नसल्याने जावली तालुक्यात जुनी व नवी भाजपा असा भेद निर्माण झाला आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून विचारला जात आहे. *यापूर्वी याच प्रश्नावर कुडाळचे चंद्रसेन शिंदे व वीरेंद्र शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते कुडाळचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे हे सुद्धा आजही भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी समजले जातात.*

                    त्याचबरोबर विधानसभा पातळीवर जरी नामदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या सोबत सर्व गाव एकजुटीने सोबत असले तरीसुद्धा स्थानिक राजकारणात गावोगावी दोन गट असल्याचे दिसून येते. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला अंतर्गत कलहाचा फटका बसलेला आहे हे स्पष्ट झाले आहे.तालुक्यात आज नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली  भारतीय जनता पक्ष ऐरावताप्रमाणे बलाढ्य ताकतीचा दिसत आहे.परंतु एखादी मुंगी ज्याप्रमाणे  ऐरावताच्या कानात शिरून  त्याचा पराभव करू शकते त्याप्रमाणे अंतर्गत वादात भाजप पोखरला गेल्यास सर्व असूनही हाती काही नसल्याचे परिस्थिती निर्माण होऊ शकते  अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page