
कुडाळ दि. ८ (प्रतिनिधी): जावळी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. सायघर येथे एका घरावर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली, तर करहर परिसरातील टोणपेवाडी येथे रस्ता खचला असून पार्टेवाडीत घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. दरम्यान बुधवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिलेने महू धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कुडाळी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सायघर येथील श्री. शंकर दगडू धनावडे यांच्या घरावर बुधवारी दरड कोसळली. तसेच गावाच्या पाठीमागील डोंगराचा मोठा भागही खचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत धनावडे कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. या घटनेची पाहणी सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, मेढा पोलीस ठाण्याचे एपीआय सुधीर पाटील आणि ग्रामसेवक मंगेश शिंदे यांनी करून नागरिकांना आवश्यक ती मदत व सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, करहर परिसरात अतिवृष्टीमुळे टोणपेवाडी येथील रस्ता खचल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काटवली येथील तुकाराम बेलोशी यांचे घर कोसळले असून जावळी बँकेचे पदाधिकारी चंद्रकांत गावडे यांच्या घराशेजारील रस्त्यालाही तडे जाऊन तो खचला आहे.
पार्टेवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावरून येणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्वी गट क्रमांक ६७१ मधून वाहत होता. मात्र, नैसर्गिक ओढ्यात भराव टाकल्याने पाण्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी शेजारील शेती, रस्ते आणि लक्ष्मण शंकर बिरामणे यांच्या घरात शिरले. अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पानस फाटा–टोणपेवाडी–वहागाव–रांजणी–बेलोशी या रिंगरोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेल्या वहागाव–टोणपेवाडी रस्त्याचा काही भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मंगळवार, दि. ७ जुलै रोजी सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप प्रतापराव परामणे, पिंपळी चे माजी सरपंच प्रमोद शिंदे आणि समीर आतार यांनी करहर परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून बाधित नागरिकांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत, सुरक्षित पुनर्वसन आणि रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
