
सूर्यकांत जोशी कुडाळ –
जावळी तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येणार असून जावळीचा स्वाभिमान जागा करण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले. हुमगाव येथे झालेल्या जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आ. शिंदे म्हणाले, जावळीतील सर्वसामान्य माणूस भलेही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल, रांगडा आहे, पण तो भेकड नाही. पैशाच्या जोरावर कोणी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या तोंडाचा घास हिरावून घेणार असेल तर ते यापुढे कधीच खपवून घेतले जाणार नाही.गेली अनेक वर्षे माझे पाय जमीनीवरच असून जावळीत बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे. कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आडवे करण्याची ताकद माझ्यात आहे. येत्या काळात सर्वपक्षीय कोअर कमिटी स्थापन करून सक्षम सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात माजी सभापती मोहनराव शिंदे, जावळी बँकेचे संचालक योगेश गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, तालुकाप्रमुख समीर गोळे, वैशाली पांगरे आदींची भाषणे झाली. तसेच मेढा नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक प्राजक्ता पाटे यांचा आ. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गोपाळ बेलोसे , बाळासाहेब भालेराव, राजुकाका शिंदे, प्रकाश परामणे, समिंद्रा जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख अविनाश दुर्गावळे, साधू चिकणे, अशोक चव्हाण, सरपंच रुपाली शिंदे, सुरेश पार्टे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन अशोक सरकाळे यांनी केले.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला, तरी स्थानिक पातळीवर कोणाशी युती करायची याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह शिवसेना (शिंदे गट), मनसे तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असल्याने भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याचे संकेत आ. शिंदे यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.