
जावळी तालुक्यात नऊ जागेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सूर्यकांत जोशी कुडाळ: जावळी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि सहा जावळी पंचायत समितीच्या जागेसाठी शांततेत मतदान पार पाडले. सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. कुडाळ गटात 63%,म्हसवे गटात 65%,तर कुसुंबी गटात 62 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. गेले पंधरा दिवस निवडणूक प्रचाराची सुरू असणारी धामधूम अखेर काल थांबले आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र अतिशय अटीतटीची आणि चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच काही ठिकाणी क्रॉस वोटिंग पॉलिसीमुळे सर्वसामान्य मतदारांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसून आले आणि त्यातच भर म्हणून जिल्हा परिषदेने पंचायत समिती मतदान एकाच मशीनवर ठेवण्यात आले होते त्यांनी या गोंधळात अधिकच भर पडली.
जावळी तालुक्यात कुसुंबी, कुडाळ, म्हसवे जिल्हा परिषद गट व जावळी पंचायत समिती सहा जागेसाठी कुसुंबी, आंबेघर, सायगाव, कुडाळ, म्हसवे व खर्शी बारामुरे गणात निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण १५४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया दुपारपर्यंत वाढली होती. जावळी तालुक्यातील सुमारे ९२ हजार मतदारांपैकी सुमारे ५७ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परगावातील मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मताची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. कुसुंबी व म्हसवे गटात चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली. पण, कुडाळ गटात फारसा विरोध दिसून आला नसला तरी गट व कुडाळ गणात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग पहाण्यास मिळाले. कमळ, शिट्टी,तुतारी, गॅस सिलेंडर आणि मशाल या चिन्हांवर क्रॉस मतदान करताना सर्वसामान्य मतदारांचा चांगलाच गोंधळ उडत होता. आता या गोंधळात मध्ये कोणाचा फायदा कोणाचा तोटा होईल हे उद्या सोमवारी समजणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी जावळीचे तहसीलदार प्रविण मुदुगुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यात एकूण १०३४ कर्मचारी व २३ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार किंवा तणावाची घटना घडली नाही. दोन्ही गटाचे समर्थक व कार्यकर्ते आपापल्या ओळखीच्या मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याबाबतही कुणीही तक्रार केली नाही.
या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, दगडू सपकाळ यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेले लक्ष पाहता जावलीच्या राजकारणाला फारच महत्त्व प्राप्त झाले असे दिसून आले.