
सूर्यकांत जोशी | कुडाळ
जावली पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी कुडाळ पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करत संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य अर्ज दाखल कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी, कारखान्याच्या माजी चेअरमन सुनेत्रा शिंदे, लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता शिंदे,भाजपाचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे, सरचिटणीस समीर आतार,प्रवक्ते सुरेश गायकवाड,जावली बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसत असतानाच सौरभ शिंदे यांच्या सोबत जमलेली हजारोंची उपस्थिती विशेष ठरली. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने वाहनांची व्यवस्था करून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अल्पावधीतच सौरभ शिंदे यांनी केलेल्या सामाजिक-राजकीय कार्यामुळे मिळालेला अबाल-वृद्ध जनतेचा विश्वास या शक्तिप्रदर्शनातून ठळकपणे जाणवत होता. कुडाळ पंचायत समिती गणात भाजपच्या या दमदार दाखल्यानंतर निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, भाजपने येथे आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.