
सूर्यकांत जोशी, कुडाळ :
जावली तालुक्यातील बेलावडे हे जन्मगाव आणि फुरसुंगी (जि. पुणे) ही कर्मभूमी लाभलेल्या तत्पर तपस्वी 1008 देवीपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा यांच्या रथोत्सवाचा सोहळा यंदाही भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. सुमारे ७५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या रथोत्सवाने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले. बेलावडे ग्रामस्थांच्या वतीने महंत धुंदी बाबा यांनी घालून दिलेल्या आदर्श नुसार या रथोत्सवाचे सुयोग्य नियोजन केले जाते. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी बेलावडे ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करतात. या रथोत्सवात बेलवडे ग्रामस्थांच्या सोबतच संपूर्ण जावली तालुक्यातील तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक भावीक हजारोंच्या संख्येने सहभागी होतात.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कुडाळ येथून रथयात्रेला प्रारंभ होतो. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांची थिरकणारी पावले, शिंग-तुताऱ्यांचा निनाद आणि गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात रथयात्रा कुडाळ, सोनगाव, आर्डे मार्गे बेलावडे येथे पोहोचते.

बेलावडे येथे आगमनानंतर शिवालयात होमहवन, शंभू महादेवाचा अभिषेक आणि सुरू असलेल्या पारायणाचा समारोप करण्यात येतो. त्यानंतर सर्व उपस्थित भक्तगणांना महाप्रसाद देण्यात येतो आणि रथोत्सवात सहभागी झालेल्यांचा सन्मान करण्यात येतो.
हिमालयातील तपश्चर्येपासून फुरसुंगीतील शिवालयापर्यंतचा प्रवास
महंत धुंदी बाबा यांनी हिमालयात कठोर तपश्चर्या व साधना करून सिद्धी प्राप्त केली होती, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यानंतर त्यांनी फुरसुंगी येथील दाट जंगल परिसरात शिवालयाची स्थापना केली. स्वतःच्या परिश्रमातून त्यांनी तो परिसर विकसित केला आणि तेथे आध्यात्मिक साधनेचे केंद्र उभे केले.
त्यांनी आपल्या सिद्धीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी केला. त्यांच्या आशिर्वादाचा अनुभव घेतल्याची भावना अनेक भक्त व्यक्त करतात. धुंदी बाबा यांनी केवळ अध्यात्म नव्हे तर कष्ट, जिद्द आणि शिक्षणाचे महत्त्व यावरही भर दिला. त्यांनी आपल्या भक्तांना शिक्षणसंस्थांना मदत करण्यासाठी प्रवृत्त केले आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावला.
उत्तराधिकाऱ्यांची परंपरा कायम
धुंदीबाबांच्या निर्वाणानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत मंगलपुरी महाराज यांची नियुक्ती झाली होती. मात्र अल्पावधीतच त्यांचेही निर्वाण झाले. सध्या महंत हेमंत पुरी महाराज हे उत्तराधिकारी म्हणून कार्यरत असून परंपरा आणि सामाजिक कार्य पुढे नेत आहेत.
भक्ती, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव
रथोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकात्मतेचा आणि श्रद्धेचा उत्सव ठरतो. विविध गावांतील भक्तगण एकत्र येत परंपरा जपत आहेत. ग्रामीण संस्कृतीतील ढोल-ताशे, लेझीम आणि पारंपरिक विधी यामुळे हा उत्सव जावली तालुक्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा ठरतो.
या वर्षीही हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला रथोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव यांची उजळणी करून गेला.
