
धरणाच्या भिंतीवर येणारच हिंमत असेल तर अडवा मानकुमरेंचे विरोधकांना आव्हान
सौरभ शिंदे व संदीप परामणे यांनी कार्यक्रमाच्या केलेल्या नियोजनाचे उपस्थितांकडून कौतुक
सूर्यकांत जोशी कुडाळ -मुंबईतील मराठा समाजाचे आंदोलन तसेच मंत्री मंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे आजच्या पाणी परिषदेला येऊ शकलो नाही.विरोधक बोलत राहतील अडचणी आणतील परंतु लक्ष देऊ नये.येत्या महिन्यात महू हातगेघर धरणाच्या भिंतीवर कलेक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे ठोस आश्वासन ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भ्रमणध्वनी वरून दिल्यानंतर महू व हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीच्या वतीने सुरु असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी जाहीर केले.
कुडाळ ता. जावली येथे महू हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीच्या वतीने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भ्रमणध्वनी वरून ना. शिवेंद्रसिंह राजेंनी उपस्थितांशी संवाद साधुन येत्या काही महिन्यात लवकरात लवकर बाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले.

कुडाळ येथील या कार्यक्रमाचे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सौरभ शिंदे व भाजपाचे मंडलाध्यक्ष संदीप परामने यांनी सुयोग्य नियोजन केले होते. भव्य व्यासपीठ, बैठक व्यवस्था, त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थित धरणग्रस्तांना व लाभधारकांना डोक्यात घालण्यासाठी दिलेल्या एका बाजूला धरणग्रस्त तर दुसऱ्या बाजूला लाभग्रस्त लाभधारक असे लिहिलेल्या टोप्या लक्ष वेधून घेत होत्या.
आपणास धरणाच्या भिंतीवर येऊ देणार नाही असे काही जण धमकी देत आहेत परंतु धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मीच सोडवणार ज्यांच्यात धमक असेल त्यांनी अडवून दाखवावे असा इशारा वसंतराव मानकुमरे यांनी विरोध करणारांना दिला.त्याच बरोबर ज्याचं तालुक्याच्या विकासात काडीच योगदान नाही. ज्याचा केवळ ब्लॅकमेलींग एवढाच उद्योग आहे त्याने आम्हाला कोणताही शहाणपणा शिकवू नये अशी टीका शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.
ना. बाबाराजे यांच्या सह विरोधक आणि पत्रकारावर मानकुमरे त्यांच्या खास शैलीत बरसले
यावेळी मानकुमरे यांनी आपल्या आवेश पूर्ण भाषणात धरण ग्रस्तांचे प्रश्न सोडवले नाही तर बाबांराजेंच्या च्या विरोधात पण उभा ठाकणार असल्याचा इशारा दिला.तर त्यांना विरोध करणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचे भावनांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांनाही त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले. एकूणच मानकुमरे यांच्या भाषणातील आवेश पाहता गेल्या 30-35 वर्षात जावली तालुक्यात जे काही चांगले घडले ते मानकुमरे यांच्यामुळेच घडले असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती..
सदरचे आंदोलन हे नामदार बाबाराजे यांना पूर्ण माहिती देऊनच करत आहे. यापूर्वीही शिंदे साहेब आमदार असताना सुद्धा आपण अनेक आंदोलने केली आहेत. ना. बाबाराजे आपल्यावर उपकार करत नाहीत. दोनवेळा प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवणे हा आपला हक्क असल्याचे मानकुंमरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले ना. बाबा राजेंना आपले अश्रू दिसावे म्हणून आंदोलन उभे केले. ना. बाबाराजेंच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे झाले असून अजूनही कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर आहेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासात नामदार बाबाराजे यांनी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळेल व सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असा विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला.

धरणग्रस्तांच्या लढ्याला लाभधारकांचे बळ -सौरभ शिंदे
प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले धरणग्रस्तांच्या लढ्याला आता लाभधारक शेतकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या लढ्याला आता चांगलीच बळकटी आली असून धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न लवकरात लवकर सुटावे आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर धरणातील पाणी मिळावे यासाठीच्या हालचाली शासन आणि प्रशासकीय पातळीवरती आता गतिमान झाले आहेत. माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निर्मिती या विभागात केली आणि ही निर्मिती करत असताना प्रतापगडचा जो लेखाजोखा मांडला होता त्यामध्ये महू व हातगेघर धरणाचा सुद्धा विचार केला होता. या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहचेल आणि नगदी पिक म्हणून उसाचे क्षेत्र वाढेल. त्यासाठी आपल्या हक्काचा कारखाना असणे आवश्यक आहे असा विचार केला गेला. प्रतापगड साखर कारखाना आणि महू व हदकेगर या धरणाच्या माध्यमातून येथील शेती सुजलाम सुफलम होऊनआपण इथला शेतकरी कामगार कर्मचारी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल या हेतूने हा कारखान्याची निर्मिती केली.ही वस्तुस्थिती आहे की इथं 30 वर्ष या लढ्यामध्ये गेलेली आहेत परंतु आता आपल्याला सगळ्यांना एक घेऊन या कृती समितीच्या माध्यमातून झालं गेलं ते सोडून हा लढा उभा करायचा आहे आणि आपण सगळेजण लाभार्थी आणि कृती समितीच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला बाबाराजेंच्या माध्यमातून शासनाकडून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
ज्या वेळेस धोम धरणाच्या कालव्याचं काम चालू होतं त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे दैवत कैलासवासी लालसिंगराव शिंदे काका आमदार होते आणि हा कॅनॉल हायवेने सरळ जाणार होता परंतु का त्यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून हा कालवा वळवून कुडाळ विभागातील जास्तीत जास्त गावे या कालव्याच्या लाभक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे धरण ग्रस्तांचे प्रश्न 95 टक्के मार्गी असताना लाभार्थ्यांचं काम शून्य टक्के झाले. गेल्या अनेक वर्षापासून लाभक्षेत्रातील जमिनी कॅनल साठी उकरुन तशाच पडले आहेत या जमिनी पुन्हा पूर्ववत होणे आवश्यक आहे यासाठी कलेक्टर आणि शासनाचे अधिकारी पदाधिकारी यांची एक चांगली बैठक आयोजित होणे आवश्यक आहे.
मानकुमरे भाऊ हे तालुक्याचे चाणक्य धरणग्रस्तांचे 95 टक्के विषय मार्गी लागले त्यामुळे राहिलेत पाच टक्के आता जर हा लढा उभा करायचा असेल आणि जनसमुदाय गोळा करायचा असेल तर लाभार्थी लोकांना सोबत घेतले पाहिजे. आता आपण लाभार्थ्यांना बरोबर घेऊन हा लढा उभा केला आहे. यामध्ये हेतू चांगला आहे त्यामुळे वसंतराव मानकुमरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार. येणाऱ्या काळामध्ये महाराज साहेबांच्या प्रयत्नातून निश्चितपणे आपल्या शिवारामध्ये पाणी लवकरात लवकर येईल. हा लढा आणि ही कृती समिती कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या गटाची नाही,कुठल्या नेत्याची नाही ही आपण सगळेजण पक्ष सगळे बाजूला ठेवून यात सामील झालेलो आहोत.असेही सौरभ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखा आपला नेता सत्तेवर असताना आणि स्वतः कडे सेनेचे मोठे पद असताना ज्याला तालुक्यात इंच भर सुद्धा काम करता आले नाही त्याला सर्व सामान्य जनतेच्या वेळ प्रसंगात उभा राहणाऱ्या तसेच तालुक्याच्या विकासात सहभाग असणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांच्या वर आरोप करण्याचा अधिकार नाही अशी टीका माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी संदीप पवार यांचेवर केली.

माजी सभापती सौ. अरुणा शिर्के,भाजपा मंडलाध्यक्ष संदीप परामणे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे,सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे,इंद्रजित भिलारे,नितीन गावडे,मच्छिन्द्र मुळीक गुरुजी, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर,माजी उप सभापती रवींद्र परामणे,तानाजी शिर्के, किसन वीर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे,सोसायटी चेअरमन मालोजीराव शिंदे, रोकडे,सरपंच सुरेखा कुंभार,उपस्थित होते.
महेश बारटक्के यांनी स्वागत प्रास्ताविक केले.विकास धोंडे यांनी आभार मानले.