सूर्यकांत जोशी कुडाळ – धावपळीच्या जीवनात घटकाभर विसाव्यासाठी पिंपळबन निर्माण करण्याची कुडाळच्या युवकांची संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे.असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
कुडाळ ता.जावली येथे लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या पिंपळबन मधील बालोद्यान व ओपन जीमच्या लोकार्पण सोहळ्यात खा.श्रीनिवास पाटील बोलत होते.यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, ऋषिकांत शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बुवा साहेब पिसाळ, तानाजीराव शिर्के, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले,चोवीसतास आॅक्सिजन देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या माध्यमातून लोकांचे शारिरीक व मानसिक आरोग्य सद्ध्रढ होईल. वनांची हानी केल्यामुळेच आज कधी अवर्षणप्रवण तर कधी अतीवृष्टी सारखी संकटे येत आहेत.निसर्गाची पूजा हीच ईश्वर पूजा.प्रत्येकाने आपल्या वडिलधाऱ्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एक तरी झाड लावून ते वाढवावे.पिंपळबनसाठी आवश्यक ते सहकार्य नक्कीच करणार.
आ.शशिकांत शिंदे म्हणाले, कुडाळच्या युवकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पिंपळबनला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.कुडाळ येथील युवकांच्या अथक परिश्रमाला सर्वसामान्य स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळेच आज या प्रकल्पाचा पहिला टप्पा लोकार्पण होत आहे.पुढील कामकाजासाठी आवश्यक निधी देणार असल्याची ग्वाही आ. शिंदे यांनी दिली.
यावेळी माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन अविनाश गोंधळी यांनी केले.प्रास्ताविक पिंपळबनचे संकल्पक महेश पवार यांनी केले.राहुल ननावरे यांनी आभार मानले.
