कुडाळ – संपूर्ण सातारा जिल्ह्यातील राजकीय व सहकारी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी तब्बल ऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना किसनवीर सहकारी साखर कारखान्याला सोळा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे.सध्या आर्थिक अडचणीमुळे हे दोन्ही कारखाने बंद आहेत.शेतकरी ऊस वेळेवर जात नसल्याने हवालदिल झाले आहेत.अशा परिस्थितीत कारखाना निवडणुकीसाठी तब्बल ऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कारखाना निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांकडुन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरळीत चालणे आवश्यक आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे . सध्यातरी दोन्ही कडून होणारे दावे प्रतिदावे पाहता निवडणूक होणारच अशी शक्यता दिसत आहे.असे असले तरीही सर्वांचाच हेतू कारखाना सुरू रहावा असा असल्याने सर्व सहमतीने निर्णय झाल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते.आणि ते कारखाना आणि शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ.शशिकांत शिंदे यांच्यातील तुटलेला समन्वय पाहता राजकीय लढाई प्रतापगड कारखान्याचे मैदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आ.शिवेंद्रसिंहराजेंनी आपण कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे व सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे स्पष्ट केले आहे.तर आ.शशिकांत शिंदे यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलून तसेच विद्यमान चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे व सौरभ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले आहे.तर जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी कारखाना सुरू ठेवण्यासाठी निवडणूक लढवणार आहे असे स्पष्ट केले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदती नंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.परंतू आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक महत्वपूर्ण ठरणार आहे.
प्रतापगडावरील आक्रमणात रणकंदन होईल. कारखाना व सहकार वाचवा अशा वल्गना होतील. युद्ध होईल किंवा तह होईल यात राजकारण मात्र नक्की जिंकेल.