–
प्रतापगड-किसनवीर च्या करारला ८ वर्ष पुर्ण झाली. त्यावेळी प्रतापगडला सहकारात टिकवायचे काम हे काका-भैय्यांना मानणाऱ्या विद्यमान संचालक मंडळानेच केले. ज्यामुळे कारखान्याचे सभासदही नसलेली मंडळी आज पॅनल टाकायची भाषा करत आहेत. कारखाना अडचणीतून वाटचाल करत असताना निवडणुकीत पॅनल टाकण्याची भाषा करणारे कारखान्याचे शत्रुच आहेत असे मत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रतापगड कारखाना हा नैसर्गिक व आर्थिक संकटामुळे खडतर प्रवास करत आहे ही वस्तुस्तिथी आहे. वास्तविक गेली ३ वर्षे कारखाना बंद आहे. किसनवीर -प्रतापगड मध्ये भाडेकरार असल्याने कारखाना चालवणे ही सर्वस्वी जबाबदारी किसनवीर च्या व्यवस्थापनाची आहे.
कै.मा.आ.लालसिंगराव शिंदे (काका) व कै.मा. राजेंद्रजी शिंदे (भैय्या) यांनी हा कारखाना स्वतःच्या जीवाचे बलिदान देऊन उभा केला आहे .
ज्यावेळी कारखाना उभारणीचे काम चालु होते त्यावेळी पॅनल टाकणारे हे बघ्याच्या भुमिकेत होते व काका – भैय्या या पिता-पुत्रांना कसा त्रास होईल यासाठी च त्यांनी प्रयत्न केले ही वस्तुस्थिती आहे. प्रतापगड कारखाना उभारून तिथे काय गाळणार? असे विचारणारे हेच लोक आहेत व काका- भैय्यांच्या दुरदृष्टी ने उभा राहीलेला कारखान्याचा आज यांना खेळखंडोबा करायचा आहे.
वास्तविक जावळी तालुक्यातील सहकाराचे मंदीर असलेल्या आपल्या कारखान्याला आज खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्व लोकप्रतिनीधींच्या सहकार्याची व मदतीची गरज आहे. प्रतापगडचे संचालक मंडळ कारखाना स्वबळावर चालवण्यासाठीच प्रयत्नशील आहेत व त्यासाठी उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल देखील सुरू आहे. त्यासाठी मा.आ.शशिकांतजी शिंदे व मा.आ.शिवेंद्रराजे भोसले यांची ही साथ मिळत आहे .
कारखान्याची निवडणुक लावुन ती संस्था आणखी अडचणीत आणण्याची किंबहुना संस्था संपवण्याची मानसिकता काही मूठभर लोकांकडून सुरू झाली आहे ,वास्तविक हे विनाशकारी कृत्य संस्थेचे सभासद नसलेले लोकच करू शकतात हे संस्थेचे सुज्ञ सभासद जाणून आहेत. कारण जे सभासदही नाहीत त्यांना त्या संस्थेशी काहीही जिव्हाळा,आपुलकी नाही तर प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण करायचे सुचते. तालुक्यात कोणतीही सहकाराची निवडणुक लागली की चार-दोन अर्ज भरायचे आणि संस्था खड्ड्यात घालायची इतकेच कामकाज अनेकवेळा ह्यांनी केले आहे.
वास्तविक कारखान्यावर ह्याची त्याची नजर असल्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. स्वतःची पोळी भाजण्यासाठी ही सगळी दिशाभुल करण्याचे चालवले आहे. दुसरीवर आरोप केल्याशिवाय आपल्याला किंमत मिळणार नाही म्हणून असे पत्रकबाजी सुरू आहे, प्रतापगड कारखाना स्वबळावर चालवण्यासाठी जे लोकप्रतिनीधी- पक्ष -गट मदत करतील त्यांना बरोबर घेऊन हा कारखाना चालु करणार, वारसा बघणार नाही म्हणार्यांनी काका-भैय्यांचा ऊल्लेख ही स्वतःच्या स्वार्थासाठी करू नये.
वास्तविक सहकारातील स्वतःच्या संस्थांची आवस्था त्यांनी काय केली ही सर्व तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला ज्ञात आहे. आम्ही दुसर्यांच्या संस्थांमध्ये लक्ष ही घालायला जात नाही ही काका व भैय्यांचे विचार जपणार्या सहकार्यांची नैतिकता आहे.भविष्यात प्रतापगड कारखानावर निवडणुक लादणार्यांना नियती कधी माफ करणार नाही. प्रतापगड सह साखर कारखाना हा मा. शरद पवार साहेब व मा.अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करेल व स्वबळावर ऊभा राहुन जावलीतील ऊस उत्पादक सभासदांना न्याय देईल.