Thursday, February 19, 2026
HomeTop Newsबदल… सामाजिक आणि वैचारिक बदल केव्हा झाला ?  एक अस्वस्थ करणारी वास्तवाची...

बदल… सामाजिक आणि वैचारिक बदल केव्हा झाला ?  एक अस्वस्थ करणारी वास्तवाची झलक

सूर्यकांत जोशी कुडाळ -काही वर्षांपूर्वी म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही ज्यावेळी कमावते झालो त्यावेळी घरातला मुलगा नोकरीला लागला की त्याचा पहिला पगार थेट वडिलांच्या हातात जायचा. घर चालायचं, थोडी बचत व्हायची, आणि मुलगा समाधान मानायचा.
आज मात्र आई-वडील मुलाचा पगार विचारायलाही कचरतात. “त्याला वाईट वाटेल…” हीच भीती मनात.

हा बदल केव्हा झाला?

कधीकाळी साडीऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळाल्याचा आनंद मानणारी आई, आज स्वतःच्या मुलीला शॉर्ट्समध्ये पाहून मनात चरफडते.
पण तोंड उघडायची हिंमत करत नाही.
कारण सल्ला नाही, उलट विरोध वाढेल… ही भीती.

हा बदल केव्हा झाला?

पूर्वी संध्याकाळच्या आधी घरी असणारी, आईला स्वयंपाकात हातभार लावणारी मुलगी, आज किचनमध्ये डोकावते आणि मोबाईलवर फूड अ‍ॅप उघडते.
घरात वास असतो… पण जिव्हाळा नसतो.

हा बदल केव्हा झाला?

लग्नाआधी एक-दोनदा भेटणे “फार पुढारलेपण” समजलं जायचं.
आज नातवंडांचं लिव्ह-इन रिलेशनशिप सहज स्वीकारलं जातं — कारण विरोध करण्याची शक्ती उरलेली नाही, फक्त गप्प राहण्याची सवय लागलेली आहे.

हा बदल केव्हा झाला?

एकेकाळी होळीच्या वेळेला लपून भांग पिणारी पिढी, आज घरातल्या तरुणांसमोर मोकळेपणाने ग्लास भरते — “कूल” दिसण्याच्या नादात स्वतःचाच आदर्श हरवत चालली आहे.

हा बदल केव्हा झाला?

पूर्वी आजी म्हणजे गोष्ट… ओवी… तेलाने मुरलेले केस… मायेची ऊब.
आज ती योगा क्लास, लाफ्टर क्लब आणि रिमोट कंट्रोलसाठी नातवंडांशी भांडण —
स्पर्धा वाढली, मायेचा संवाद कमी झाला.

हा बदल केव्हा झाला?

ज्याच्याशी घरात बोलायचं नाही, त्याला पैसे देऊन ऐकतो.
कौन्सिलर जवळचा वाटतो, पण स्वतःचं भावंड “आउटडेटेड” वाटतं.
पैशांची भाषा बदलली आहे — आता नवरा-बायकोचं अर्थकारणही घरच्यांपासून लपलेलं.
सीएला सगळं माहित… पण आई-वडिलांना नाही.

हा बदल केव्हा झाला?

पूर्वी वडिलधाऱ्यांचा मान ठेवणारी पिढी, आज सार्वजनिकपणे नवऱ्याचा अपमान करते.
मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात…
आणि मुलाचे आई-वडील मुकाटपणे मान खाली घालतात.

हा बदल केव्हा झाला?

आज तरुण पिढी नोकरी बदलते, गाव बदलते, स्वप्नं बदलते…
आणि आई-वडिलांना केवळ “इन्फॉर्म” केलं जातं — “डिस्कस” नाही.
मित्र, पार्टी, ब्रेकअप, ट्रिप — या गोष्टी व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली पालकांच्या हाताबाहेर जातात.

हा बदल केव्हा झाला?

देवघरात घंटा वाजवण्याऐवजी घरात भांडणं होतात.
नात्यांची पूजाच आता ओझं वाटू लागली आहे.
कुळाचार “जुने” झालेत, संस्कार “ओल्ड फॅशन” झालेत.

आणि आज…

पन्नाशी ओलांडलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर राहिलेलं नाही —
थेट दरी तयार झाली आहे.

हा बदल एका रात्रीत झाला नाही.
तो टीव्हीच्या पडद्यावरून घरात उतरला.
मोबाईलच्या स्क्रीनवरून मनात शिरला.
आणि हळूहळू आपली मुळं हलवून गेला.

आज प्रश्न फक्त एवढाच नाही की,
“हा बदल केव्हा झाला?”
तर अधिक गंभीर प्रश्न हा आहे की —
“या बदलामध्ये आपण स्वतःला कुठे गमावून बसलो?”

आजही वेळ गेली नाही.
संवाद जिवंत ठेवला, तर नात्यांमध्ये उब परत येऊ शकते.
संस्कार जपले, तर पिढ्यांमधली दरी पूलात बदलू शकते.

पण त्यासाठी…
आता तरी विचार करायलाच हवा.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page