Thursday, February 19, 2026
HomeTop Newsबांधकाम विभागाचा नियोजनशून्य कारभार; कुडाळ बाजारपेठेतील रस्ता-गटार काम अर्धवट अवस्थेत  ठप्प: धुळीचे...

बांधकाम विभागाचा नियोजनशून्य कारभार; कुडाळ बाजारपेठेतील रस्ता-गटार काम अर्धवट अवस्थेत  ठप्प: धुळीचे ढग, दुर्गंधी आणि वाहतूक कोंडीने ग्रामस्थ हैराण :
तांत्रिक अडचण की राजकीय दबाव? नागरिकांचा सवाल



सूर्यकांत जोशी, कुडाळ. 9421214450
         जावली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ येथे इंदिरानगर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकादरम्यान बाजारपेठेतून  सुरू असलेले बंदिस्त गटार व रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत ठप्प आहे. नियोजनाचा पूर्ण अभाव, अडथळे दूर करण्याची पूर्वतयारी नसणे आणि काम सुरू करून तेच मध्येच थांबवणे या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक मोजमाप, नकाशा तपासणी, झाडे व अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रिया पूर्ण केल्या नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, कामाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि ठेकेदाराने हात झटकत काम थांबवले. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दरम्यान हे काम रखडल्याने यामागे राजकीय हस्तक्षेप तर नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे.
व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान
         दोन महिन्यांपासून दुकानांसमोर उंचावलेले बंदिस्त गटार आणि त्याखालील खड्डेमय रस्ता यामुळे ग्राहकांना दुकानात प्रवेश करणे कठीण झाले आहे. रस्त्यापासून सुमारे दोन फूट उंच गटार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात टाकलेली मातीची भर प्रचंड धुरळा निर्माण करत आहे. या धुळीमुळे दुकानातील मालावर थर साचत असून व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.उंच गटारामुळे वाहन पार्किंगला अडथळा निर्माण होत असून बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. आधीच एसटीची एकेरी वाहतूक सुरू असल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला आहे असे व्यापारी वर्गातून नाराजीचे स्वर उठत आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वाहनांवर साचणारी धूळ आणि रस्त्यातील अस्वच्छता ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
आरोग्याचा प्रश्नही गंभीर
            रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी दिवसभर धुरळ्यात बसून राहतात. शेतकरी आपला शेतीमाल रस्त्याच्या कडेला बसून विकत असतात या शेतीमालावर तसेच खाद्यपदार्थावर धुळीचे थर असतात. दुर्गंधीयुक्त अर्धवट गटारामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध प्रकारचे डास व कीटकांचे प्रमाण वाढले आहे.आरोग्याचा प्रश्न गंभीर असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
लग्नसराईत बाजारपेठेवर परिणाम
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून काही दिवसांवर मुख्य लग्नसराई येऊन ठेपली आहे.या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल अपेक्षित असते. ऐन लग्न सराईत गटार व रस्त्याचे काम सुरू राहिल्यास बाजारपेठेतील व्यापारावर परिणाम होणार आहे व व्यापारी वर्गाला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
तातडीची मागणी
कामाची गुणवत्ता सुधारून, नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेळेत हे काम पूर्ण करावे, अशी ठाम मागणी कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे. “काम सुरू करण्यापूर्वी नियोजन नव्हते, आता जबाबदारी कोणाची?” असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
बांधकाम विभागाने तातडीने पुढाकार घेतला नाही, तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी तीव्र भावना सध्या कुडाळ बाजारपेठेत उमटताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page