रक्त लघवीचे नमुने तपासणी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय
सूर्यकांत जोशी कुडाळ – जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या सोयी साठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून रक्त लघवी या सह विविध तपासण्याचा ठेका महालॅब या लॅबरोटरीला देण्यात आला आहे. परंतु सदर लॅब चे मशीन गेल्या पंधरा दिवसा पासून बंद आहे. जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णाच्या रक्त लघवी तपासणीचे नमुने या लॅब ला पाठवले जातात. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून लॅब चे मशीन बंद असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हापरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवली जाते. गेल्या काही वर्षात या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून समाजाभीमुख चांगली सेवा दिली जात आहे.तसेच दर्जेदार औषधे दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण या शासकीय आरोग्य सेवा घेऊ लागले आहेत.
असे असतानाच रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान होण्यासाठी बऱ्याचदा रक्त लघवीचे नमुने तपासावे लागतात. लॅब बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. तरी जिल्हा आरोग्य विभागाने तसेच लोकप्रतिनिधीनी तातडीने लक्ष घालून ही सुविधा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी होत आहे.