Saturday, June 13, 2026
HomeTop Newsम्हसवे गटात मानकुमरे यांच्या विरोधात मतदारांत तीव्र असंतोष - संदीप पवार ज्यांचा...

म्हसवे गटात मानकुमरे यांच्या विरोधात मतदारांत तीव्र असंतोष – संदीप पवार
ज्यांचा धनुष्यबाणाने राजकारणात उदय झाला त्यांचा अस्त धनुष्यबाणच करेल


जावली प्रतिनिधी
               १९९७ पासून सलग २५ वर्षे सत्तेत असूनही जावली तालुक्यातील संबंधित भागाचा सर्वांगीण विकास झाला नाही, कधी धरणग्रस्तांना तर कधी लाभ क्षेत्रातील जनतेला झुलवत ठेवत राजकारण झाले त्यामुळे हा प्रश्न आज सामान्य मतदार थेट विचारू लागला आहे. जनतेने वारंवार संधी दिल्यानंतरही प्रत्यक्ष कामांचा अभाव, हीच या दीर्घ सत्ताकाळाची ठळक ओळख ठरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेली 25 वर्ष धरणग्रस्तांच्या भावनांशी खेळ सुरू असून अनेक धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम या विभागाच्या तथाकथित नेत्यांनी केले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील उद्रेक उघड होईल. यावेळी म्हसवे गटात बदल घडवण्याचा निर्णय मतदारांनी घेतला असून ज्या धनुष्यबाणाने जावलीच्या राजकारणात मानकुमरे यांचा उदय झाला त्याच धनुष्यबाणाने त्यांचा अस्त होईल असे प्रतिपादन म्हसवे गटातील शिवसेनेचे उमेदवार संदीप पवार यांनी केले आहे.      

म्हसवे जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीप पवार यांच्या पद यात्रेला प्रत्येक गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या पद यात्रेत राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेते तेजस शिंदे, शिवसेना नेते अंकुशबाबा कदम, खर्शी बारामुरे गणाचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उमेदवार विठ्ठल गोळे, म्हसवे गनाच्या उमेदवार शिल्पा शिंदे , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकट निकटवर्ती डॉ. मिलिंद शिंदे, राहुल पवार.यांच्या सह शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक पातळीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था अशा विविध पदांवर दीर्घकाळ अधिकार असूनही धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटले नाही. शासनाचा फंड हा सार्वजनिक कामे रस्ते, पाणी वीज इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठीच असतो आणि हा पैसा जनतेच्या करातूनच शासनाकडे आलेला असतो त्यामुळे ही विकास कामे केली म्हणजे मोठी मेहरबानी केली असे होत नाही त्यासाठीच लोकांनी निवडून दिलेले असते.  युवकांना रोजगार, पायाभूत सुविधा, तरुणांसाठी संधी याबाबत ठोस कामे दिसत नाहीत. “सेवा नव्हे, सत्ता” या मानसिकतेतूनच राजकारण झाले, असा आरोप प्रस्थापित नेत्यावर जनतेतून होत आहे.पदांचा अति हव्यास ठेवून विकासाकडे दुर्लक्ष झाले. अनेक महत्त्वाची पदे एकट्याने उपभोगली गेली; मात्र भागाचा चेहरामोहरा बदलला नाही, ही वस्तुस्थिती जनतेसमोर आहे. तरुणांसाठी ना नोकरीची दिशा, ना व्यवसायासाठी मार्गदर्शन, ना उद्योगांसाठी सुविधा—फक्त आश्वासनांची मालिकाच मिळाल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून, आमदार निधीतून झालेल्या कामांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न झाले, पण स्वतःच्या कर्तृत्वाचा हिशेब मात्र कोरा राहिला, अशी टीकाही होते. आज अचानक काही रस्त्यांची आश्वासने दिली जात असली, तरी गेल्या २५ वर्षांत पाठपुरावा, निधी किंवा सहकार्य का झाले नाही, हा सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे भांडवल करून धरणग्रस्तांना झुलवायचे आणि लाभ क्षेत्रात गेले की लाभ क्षेत्रातील जनतेला पाण्याची आशा दाखवायची ही फसवणूक जनतेच्या ध्यानात आली आहे.

धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर ठोस उपाय न करता केवळ राजकीय वापर झाला, अशी भावना आहे. तसेच जावली बँकेतील भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचे प्रश्न उपस्थित होत असून याचे स्पष्ट उत्तर जनतेला अपेक्षित आहे.याशिवाय सहकारी कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून नेतृत्व घडू दिले नाही, माजी सभापती काशिनाथ दादांचे नेतृत्व कोणी संपवले  अशी टीका होत आहे. दीर्घ सत्ताकाळ असूनही जर विकास दिसत नसेल, तर त्याची जबाबदारी कुणाची, हा थेट प्रश्न मतदार विचारत आहेत.या पार्श्वभूमीवर विरोधी नेत्याच्या  २५ वर्षांच्या राजकारणाबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत असून, जावलीला आता दिखाऊ नव्हे तर प्रामाणिक, नव्या विचारांचे नेतृत्व हवे, अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीला परिवर्तनाची गरज असल्याचा सूर अधिक तीव्र होत चालला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page