Homeराजकीयराजकीय  आखाडा संपला : बाजार समिती  सक्षम  चालण्यासाठी उपाय योजना आवश्यक.

राजकीय  आखाडा संपला : बाजार समिती  सक्षम  चालण्यासाठी उपाय योजना आवश्यक.

 जावली  महाबळेश्वर बाजार समिती निवडणूक विश्लेषण 

सूर्यकांत जोशी कुडाळ – अपेक्षे प्रमाणे जावली महाबळेश्वर बाजार समिती  निवडणुकीचा  निकाल एकतर्फी लागला.तीन आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा फौंज फाटा पाहता हीं निवडणूक सुरुवातीपासून एकतर्फी होती. निवडणूक  निकालचे  चित्र स्पष्ट असल्याने विरोधी  पॅनलने फारसे गांभीर्याने हीं निवडणूक घेतल्याचे  दिसून आले नाही. या मध्ये  बाजार समितीला नक्कीच आर्थिक झळ बसली. संस्थेचा  विचार  करता निवडणुकीसाठी  झालेला खर्च परवडणार नाही. प्रचारात निवडणूक जाणीवपूर्वक लावल्याचे एकमेकांवर आरोप प्रचारा दरम्यान दोन्ही पॅनल कडून झाले.या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय  वातावरण  चांगलेच  ढवळून  निघाले. जावली तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता  केवळ  संचालक मंडळ बाजार समिती  सुरळीत चालवेल असे गृहीत  धरणे  चुकीचे  होईल. त्यासाठी शेतीमालचे  उत्पादन मोठ्या प्रमाणात  वाढवण्यासाठी  उपाययोजना होणे आवश्यक आहे.

         संस्थेला आर्थिक बुर्दंड नको म्हणून आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, आ. शशिकांत शिंदे आणि आ. मकरंद  पाटील यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सत्तेतील अपेक्षित वाटा वाटून घेतला. मग या नेत्यांनी आपण  तिघे एकत्र आलो की निवडणूक बिनविरोध होणार असे गृहीत धरले  की तसें दाखवले.निवडणूक अर्ज विक्रमी दाखल  झाले त्याच वेळी निवडणूक लागणार  हे स्पष्ट होते.बिनविरोध  प्रक्रियेत तीन आमदार एकत्र येताना विरोधात  असणाऱ्या माजी आमदार सदाशिव सपकाळ व दीपक पवारांना विचारात  घेतले  गेले नाही का असाही सवाल  या निवडणूक प्रचारात  होता.

          सहकारातील  निवडणुका या बहुदा पक्ष पातळीवर लढवल्या जात नाहीत. त्या स्थानिक पातळीवर आघाड्या करून लढवल्या जातात. गेल्या वीस पंचांवीस  वर्षातील  जावली  तालुक्यातील सहकारातील  निवडणूका पाहता सत्ताधारी गटा सोबत  माजी आमदार सदाशिव सपकाळ दिसून आले. यावेळी त्यांना विचारात  घेतले  गेले नाही का.दुसरीकडे  आ. शशिकांत शिंदे  राष्ट्रवादी चे  प्रतिनिधित्व करतात त्यांना सत्तेत वाटा मिळत असताना  त्यांनी दीपक  पवारांना विचारात  घेऊन त्यांना थांबवंण्याचा प्रयत्न करणे  अपेक्षित होते. असे विधान या निवडणुकीच्या सांगता  सभेत  वसंतराव  मानकुमरे यांनी करून एका दगडात  दोन पक्षी  मारण्याचा प्रयत्न केला.

               सत्तेत येण्यासाठी अट्टाहास करताना विरोधकांनीही  निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक संख्या बळाचा विचार करणे  आवश्यक होते. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नव्हते निवडणूक निकालाने स्पष्टही झाले.विरोधकांना  पराभव  दिसत असताना सुद्धा केवळ लोकशाहीतील हक्क म्हणून निवडणूक लावली म्हणणे  योग्य आहे का याचा  विचार होणे आवश्यक आहे.

     निवडणूकीचा राजकीय  आखाडा  संपला. एक महिन्यापूर्वी आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले  आणि आ. शशिकांत शिंदे  यांचे एकमेकांच्या  विरोधात  असणारे  कार्यकर्ते हातात हात घालून  फिरताना  दिसले. हे चित्र काहीसे सुखवणारे होते.हे हातात घेतलेले हात कायम  हातात राहतात  की निवडणूक निकाल होताच एकमेकांवर रोखले  जातात हे लवकरच  स्पष्ट होईल.आता तालुक्यातील पायाभूत विकासाचा  विचार  होणे आवश्यक आहे.

जनतेला  पाण्यापासून वंचित  ठेवण्यास जबाबदार  कोण?

        पाणी हे कृषी  विकासाचे  मूलभूत  साधन  आहे. जावली  तालुक्यात दरवर्षी  विक्रमी पाऊस पडतो. परंतु  उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून पासूनच  अनेक गावांना पाणी टंचाईचा  सामना  करावा  लागतो.गेली पंचवीस वर्षे हक्काच्या पाण्यापासून जावळीतील जनतेला वंचित  ठेवले  गेले हे अपयश कोणाचे यावर गांभीर्याने विचार  करावाच  लागेल.

          कोयना  आणि कण्हेर धरणात  जमिनी  गेल्याने जावळीतील  जनता  विस्थापित झाली. धरण  जावळीच्या  हद्दीत आणि पाणी मात्र इतर  जिल्ह्यातील शेतीला. कण्हेर धरणावरील उपासा सिंचन  योजनेची  काय अवस्था  आहे.हीं योजना बंद का पडली. आज अनेक शेतकरी स्वतः खर्च करून पाईपलाईन करत  आहे. हा खर्च  गरीब  शेतकऱ्यांना परवाडणारा  नाही. त्यामुळे मेढा  विभागातील  जनतेची  अवस्था धरण  उशाला  आणि कोरड  घशाला  अशी  आहे.

            कुडाळी नदी  वरील  महू  व हातगेघर धरण  तर केवळ निवडणूक लागलीकी  चांगलेच  फार्मात येते. या धरणाला  पंचांवीस  वर्षे  उलटली  तरी  या पाण्याचा उपयोग म्हशी  अन वाकला  धुण्यासाठी होतो असे जेष्ठ  नेते वसंतराव  मानकुमरे  सांगतात. हे पाणी शेतात  येणार केव्हा अन हीं जबाबदारी कोणाची असा सवालही  जनतेतून  उपस्थित होतो. जावली  मतदार  संघांचे   आ. शशिकांत  शिंदे आणि आ. शिवेंद्रसिंह राजे यांनी दहादहा  वर्षे  प्रतिनिधित्व केले. या वीस  वर्षात  या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या  शेतात आणण्यात त्यांना यश  आले नाही अशीच  भावना  जनतेतुन व्यक्त होते. या धरणाच्या कालव्याचे काम  अत्यंत संथ गतीने  सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आ. शशिकांत  शिंदे  यांनी शासन पातळीवर प्रयत्न करून  आवश्यक निधी  उपलब्ध केल्यास हे काम जलद  होऊन पाणी शेतात  येईल.व शेती उत्पादन वाढू शकेल 

           अशाच  पद्धतीने गेली  पंचांवीस  ते तीस वर्षांपासून मेढाविभागातील  जनता  बोंडारवाडी  धरण होण्यासाठी टाहो फोडत आहे. या विभागातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे धरण होऊन शेतीला पाणी मिळाल्यास येथेही कृषी विकासाला चालना  मिळेल तसेच  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल.

 भाजीपाला, फळे  व धाण्याची जावलीत  आयात

         तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र असून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीपाला फळे व धान्याची दररोज आयात करावी लागते.येथील  शेतीला  हक्काचे  पाणी मिळाल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला  फळे  व धान्याचे उत्पादन होऊन  ते विक्रीसाठी बाजार समितीकडे  येऊ शकेल.आणि शेतकऱ्या सोबतच  बाजार समितीही  आर्थिक सक्षम  होऊ शकेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular