सूर्यकांत जोशी कुडाळ -9421214450
आजकाल समाजात वृत्तपत्र हे केवळ मोफत प्रसिद्धीचं व्यासपीठ आहे असा गैरसमज तयार झाला आहे. पण खरं तर त्यामागे मोठा खर्च, श्रम व जबाबदारी असते. त्यामुळे प्रसिद्धीची अपेक्षा ठेवता तर वृत्तपत्र चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये आपलेही योगदान देणे तितकेच महत्त्वाचे कर्तव्य आहे.
समाजजीवनातील घडामोडी, राजकीय उलथापालथ, सामाजिक उपक्रम, आपत्ती अथवा न्याय-अन्यायाची लढाई या सगळ्याचा आरसा म्हणजे वृत्तपत्र. समाजाला दिशा देणारे, सत्याला वाचा फोडणारे आणि सामान्य माणसाच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देणारे माध्यम म्हणून वृत्तपत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
पण आजच्या वास्तवाकडे जर पाहिले तर हा प्रश्न समोर येतो – आपण वाचक म्हणून आपल्या जबाबदारीचे भान ठेवतो का?
वृत्तपत्राचा खर्च व जाहिरात व्यवसाय
वृत्तपत्र चालवण्यासाठी कागद, छपाई, वाहतूक, मजुरी, कार्यालयीन खर्च अशा असंख्य जबाबदाऱ्या असतात. हा खर्च फक्त वाचकांकडून मिळणाऱ्या अंक विक्रीतून भागत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात व्यवसाय हेच प्रमुख आधारस्तंभ असतो.परंतु अलीकडे जाहिरातदारांची संख्या कमी झाली आहे. अनेक जण जाहिरात देतात, पण पैसे देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे वृत्तपत्र व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडतो.
सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा
आजकाल अनेक सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्यांना वाटते की, “आपल्या उपक्रमाची बातमी पेपरमध्ये आलीच पाहिजे.” ही अपेक्षा योग्य आहे. पण तेवढ्यापुरतेच विचार न करता हे लक्षात घ्यावे लागेल की —
आपण ते वृत्तपत्र नियमित वाचतो का?
आपण त्याची वार्षिक सदस्यता घेतो का?
आपण वर्षातून एक जाहिरात तरी दिली आहे का?
वृत्तपत्राचे नि:स्वार्थ कर्तव्य
वृत्तपत्र म्हणजे केवळ जाहिरातींवर चालणारा व्यवसाय नाही. तो सामाजिक बांधिलकीने जोडलेला व्यवसाय आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, अन्याय, शोषण, प्रशासनातील गोंधळ, परंपरा जपणारे उपक्रम, समाज प्रबोधन अशा मुद्द्यांवर वाचकांच्या बाजूने निःस्वार्थपणे लढणे हे वृत्तपत्राचे कर्तव्य असते. अशा प्रसंगी कोणीही जाहिरात देतो किंवा नाही याची पर्वा न करता वृत्तपत्र आपली जबाबदारी निभावतं.
व्यक्तिगत व राजकीय लाभासाठी प्रसिद्धी मोफत नाही.
हल्ली अनेकदा शासनाच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या विकास कामांची भूमिपूजनाचा किंवा उद्घाटनाचा देखावा अथवा बडेजाव केला जातो.व्यक्तिगत अथवा राजकीय फायद्याचा हेतू मनात ठेवून वेगवेगळ्या प्रकारची निवेदने अधिकाऱ्यांना देणे. आणि त्याची प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली जाते अशावेळी जर संबंधित वृत्तपत्रासाठी काही जाहिरात योगदान असेल तर बऱ्याचदा अशा प्रकारच्या बातम्या त्यातील सामाजिक बांधिलकी आणि सत्यता पडताळून दिल्या जातात. कोणतीही अशी बातमी बनवताना संबंधित प्रतिनिधीचा वेळ,पैसा व श्रम लागत असतात त्यामुळे अशा व्यक्तिगत लाभासाठी असणाऱ्या प्रसिद्धीला योग्य ते मानधन देणे हा व्यवहार आहे.
वाचकांचे कर्तव्य
म्हणूनच समाजातील प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवे की:
वृत्तपत्र फक्त प्रसिद्धीसाठी वापरण्याचे साधन नाही. त्याला चालवण्यासाठी जाहिरात स्वरूपात योगदान देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी “आपली बातमी आलीच पाहिजे” एवढीच अपेक्षा न ठेवता, किमान वार्षिक सदस्यता, एक छोटी जाहिरात किंवा आर्थिक मदत या स्वरूपात हातभार लावला पाहिजे.
वृत्तपत्र ही लोकशाहीची चौथी स्तंभ आहे. तिचे अस्तित्व टिकले पाहिजे तर समाजाने केवळ बातम्यांची अपेक्षा न ठेवता, त्यासाठी जाहिरात स्वरूपात योगदान देणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच समाजाचे खरे प्रतिबिंब दाखवणारे आणि न्यायासाठी आवाज उठवणारे हे माध्यम समर्थपणे उभे राहील.
Heard about betvnd9. Any pros and cons I should know about before signing up? Customer service good? Withdrawal times quick? Help a brother out! See more: betvnd9