शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयात आक्रोश :
कुडाळ – शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय मेढा या ठिकाणी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष श्री कमलाकर नाना भोसले यांचे सह जावली तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी आक्रोश केला यावेळी राजकीय पदाधिकारीही उपस्थित होते,शेतकऱ्यांसोबत उर्मटपणे वागणाऱ्या वायरमेन आणि कर्मचाऱ्यांना झोडपून काढू, आणि महावितरणच्या होणाऱ्या नुकसानीस स्वतः महावितरण जबाबदार राहील असा सज्जड इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर नाना भोसले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी श्री भोसले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतावर उभे केलेले डी पी आणि पोलचे भाडे अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, त्याचबरोबर परिसरात वाघ आणि बिबट्या यांसारख्या अनेक वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे त्वरित लोड शेडिंग बंद करून कायमस्वरूपी दिवसा सोळा तास लाईट द्यावी, शेतकऱ्यांना बोगस विजबिले देणे बंद करावे, महावितरण कंपनीने मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी केली. यावेळी जावली तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
