
कुडाळ — शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आर्डे, ता. जावली येथे एका 57 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आगतराव बाबुराव जाधव असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता आगतराव जाधव या शेतमजुरीने केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी आरोपींकडे गेल्या होत्या. यावेळी पैशांच्या कारणावरून वाद होऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादींच्या घरी जाऊन त्यांच्या पती आगतराव जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, अदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओंकार विलास जाधव, विलास शामराव जाधव, अश्विनी दिपक जाधव आणि सुनिता विलास जाधव सर्व रा. आर्डे, ता. जावली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आर्डे गावात तणावपूर्ण शांतता आहे कोणताही अनुचित प्रकार करू नये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.