सूर्यकांत जोशी कुडाळ 9421214450
परंपरेवर सावली टाकणारे बदल
पूर्वी संसार म्हणजे कुटुंबाची उब, शेतीची धडपड, नात्यांचा सांभाळ आणि संस्कारांचा गंध. आज संसाराची व्याख्या बदलली आहे—करिअर, शहरातील धावपळ, मोबाईल, डिजिटल नाती आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. नात्यांची जुळवाजुळव कमी, “आपण”पेक्षा “मी”ला महत्त्व. हे बदल पाहून जुनी पिढी अस्वस्थ होते, चिंता निर्माण होते. नवी पिढी शिक्षणाने सुशिक्षित होत आहे परंतु संस्कार मात्र विसरत आहे.पूर्वी कुटुंब म्हणजे आजी,आजोबा, आई-वडील, भाऊ,बहीण अगदी आठ दहा नव्हे तर त्याहून अधिक कितीतरी लोकांचा हा कुटुंब कबेला असायचा. पैसे आणि सोयी सुविधाचा अभाव होता पण प्रेम आणि जिव्हाळा खूप होता.आता पैसा आणि सुविधा भरपूर निर्माण झाल्या आणि प्रेम आणि विश्वास लुप्त होऊ लागला आहे. कुटुंब म्हणजे नवरा,बायको व मुले ती सुद्धा अगदी काही वर्षांपर्यंत त्यानंतर त्यांना शिक्षणाच्या नावाखाली अलिप्तच ठेवले जाते त्यामुळे येणाऱ्या काळात आई-वडील आणि मुलाचे नाते कसे असेल याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
चिंता का होते ?
संयुक्त कुटुंब विरळ झाले, नात्यांची गाठ सुटली. मुलांना पालकांना वेळ नाही, पालकांना मुलांचा आधार नाही.
यशाच्या शर्यतीत समाधान हरवलं. साधेपणा, संयम, समाधान यांचे तत्त्व विसरले गेले. बदलाच्या या उलथापालथीत समाजाला वाटतं—परंपरा नष्ट होत आहेत, संस्कार ढासळत आहेत. हीच खरी चिंता. ज्यावेळी मुलाचे लग्न ठरवायचे असते त्यावेळी मुलीला व मुलीकडच्या लोकांना मुलाच्या आई-वडिलांकडून मुलाकडून त्याचे शिक्षण, नोकरी,शहरात मध्ये फ्लॅट,गाडी याबरोबरच गावाकडे शेतीवाडी असावी अशा सर्व अपेक्षा असतात.हे सर्व मुलाच्या आई-वडिलांनी करायचे असते आणि हे सर्व ऐश्वर्य मुलाच्या आई-वडिलांनी काबाड कष्टातून उभे केलेले असते. त्यामागचा हेतू आपण जे भोगले ते आपल्या मुलांना भोगायला लागू नये किंवा आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाला पाहिजे हा असा अट्टाहास असतो.त्यामागे एक सुप्त भावना लपलेले असते आणि ती म्हणजे मुलाने आणि सुनेने आपल्या नात्याचा आणि ज्येष्ठत्वाचा मान राखला पाहिजे. त्याचबरोबर वृद्धापकाळात आधार दिला पाहिजे. परंतु लग्नापूर्वी मुलाकडून व त्याच्या आई-वडिलांच्याकडे वारेमाप अपेक्षा करणाऱ्या मुलींना मुलाच्या आई-वडिलांनी निर्माण केलेली सर्व स्थावर प्रॉपर्टी हवी असते.त्याचबरोबर ज्या मुलाचे तळहाताच्या फोडाप्रमाणे पालन पोषण करून त्याला योग्य ते शिक्षण देऊन त्याला आर्थिक सक्षम केलेला मुलगा हवा असतो. पण त्याचे आई वडील व नातेवाईक नको असतात. असा विचार करणाऱ्या मुली स्वतःच्या आई-वडिलांचा मात्र विचार करत नाही कारण उद्या तिच्याही घरात एक सून येणार असते आणि तीने आपल्या प्रमाणे विचार केला तर आपल्या आई-वडिलांचे भविष्यात काय होईल हे मात्र ती विचार करायचे विसरून जाते आणि ह्या स्वार्थी विचारामुळेच कुटुंब व्यवस्था उध्वस्त होऊ पाहत आहे. अर्थात हे प्रमाण शहरी विभागात जास्त दिसून येत आहे परंतु त्याची लागन ग्रामीण भागातही होऊ पाहत आहे. मुलीचे आई-वडील फक्त आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे तिचा संसार म्हणजे तिचा नवरा आणि ती एवढाच विचार करतात परंतु त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ज्यांनी हा संसार उभा करण्यासाठी आपल्या आयुष्याची होळी केली त्यांच्या संसाराची होळी करून आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल का याचा विचार करणे आवश्यक आहे. किंवा अशी अपेक्षा ठेवणे ही चिंतेची बाब आहे परंतु यावर समाजाने चिंतन करून आपल्या मुला-मुलींना त्यांची जबाबदारीचे जाणीव करून देणे गरजेचे आहे.याबाबत चिंतन होण्याची गरजेचे आहे
बदलाचा दुसरा चेहरा
पण या नाण्याची दुसरी बाजूही आहे. स्त्रियांना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं घडली. तंत्रज्ञानामुळे जग एका क्लिकवर आलं, संधींची दारे उघडली.
हो, नाती बदललीत; पण त्यात समतेचा, स्वातंत्र्याचा, आत्मसन्मानाचा अंश वाढला. हा बदल चिंतेऐवजी चिंतनासाठी प्रेरणा देणारा आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे सुद्धा नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे.
चिंता थांबवा, चिंतन सुरू करा
बदल म्हणजे नेहमीच नाश नव्हे, तो विकासाचं बीज असतो. म्हणून जुनं नाकारू नका, नवं आंधळेपणाने स्वीकारू नका.
नात्यांची उब जपा, संस्कारांची पायाभरणी ठेवा, पण नवीन काळाच्या संधींना हात द्या. जुनं आणि नवं यांचा समतोल साधणं हाच खरी शाश्वत संसारयात्रा आहे.
काळ बदलतोय, संसार बदलतोय. चिंता करून काही साध्य होणार नाही. चिंतन करून आपण या बदलाशी जुळवून घेऊ शकतो.
आजचा मंत्र एकच :
“चिंता नको, चिंतन हवे.”