Thursday, February 19, 2026
HomeTop Newsहयातभर कष्ट करुन कमावलेले धन वापरण्याची हीच योग्य वेळ ;

हयातभर कष्ट करुन कमावलेले धन वापरण्याची हीच योग्य वेळ ;

 सूर्यकांत जोशी कुडाळ – हयातभर कष्ट करत असताना त्यातून भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी तसेच अडिअडणीच्या प्रसंगी उपयोग व्हावा यासाठी सुजाण लोक बचत करत असतात. कमवून ठेवलेले धन संपत्ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी वापरण्याची हीच योग्य वेळ आहे. गेले सहा महिने अनेक व्यवसाय ठप्प आहेत. अनेकांना रोजगार नाही अशी स्थिती आहे. परंतु ज्यांनी आजपर्यंत कमावुन शिल्लक राखलेले आहे .किमान त्यांनी तरी या परिस्थितीत जीव धोक्यात घालून कमावण्याची आवश्यकता नाही.आताच्या परिस्थितीत आता फक्त आपल्या घरातच कुटुंबियांसह सुरक्षित राहू शकणार आहोत. हे ध्यानात घेऊन अती तातडीच्या कारणा शिवाय घरातून बाहेर पडणे हितावह नाही. ‘सर सलामत तो , पगडी पचास ‘   या म्हणी प्रमाणे या संकटातून सहीसलामत जगलो वाचलो तर अजूनही भरपूर कमावता येईल. पण कमावलेल धन आता उपयोगात न आणून जीव धोक्यात घातला तर कमावलेले सर्व मातीमोल होईल.

        आज कोरोनाने एवढे विक्राळ रुप धारण केले असताना विशेषतः युवापिढी आम्हाला काही होत नाही असे म्हणून बिनधास्त आहे. परंतू शारिरीक तंदुरुस्ती मुळे कदाचित कोरोनाची लक्षणे दिसून येणार नाहीत. परंतू आपल्या चूकीमुळे घरातील तसेच समाजातील लहानमुले, महिला, वयोवृद्धव्यक्ती व अशक्त आजारी 

कोरोना बाधित रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही  याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 

            कोरोना बाबत समाजातील भीती आणि गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. कोरोना होणे म्हणजे अपराधी वाटणे किंवा समाजात कमी पणाचे वाटून घेणे चुकीचे आहे. इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच हा आजार आहे.फक्त याचा संसर्ग इतर आजारांच्या तुलनेत जास्त वेगाने होत आहे.या आजाराचे वेळीच निदान करुन उपचार घेतले तर यातून सहीसलामत बाहेर पडता येते. तर वेळीच स्वतःला अलगीकरण करुन घेतले तर संभाव्य संसर्गापासून आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला वाचवू शकतो.हा आजार होणे म्हणजे अपराध मुळीच नाही. अनवधानाने हा संसर्ग कोणालाही होऊ शकतो.यातुन रथी महारथी सुद्धा सुटले नाहीत. उलट अनेक मान्यवर आपण कोरोना बाधित असल्याचे जाहीर पणे सांगत आहेत. हाच मनाचा मोठेपणा समाज हितासाठी सर्वसामान्य जनतेही दाखवण्याची आवश्यकता आहे.

           परंतू आजही अज्ञान म्हणून किंवा कोरोनाची व समाजाची भिती म्हणून अनेकजण लक्षणे असूनही कोरोना टेस्ट करण्यासाठी नकार देत असल्याचे पण पहायला मिळते.आणि यामुळे संसर्ग ही वाढत आहे. आणि रुग्ण अत्यावस्थ झाल्यावर बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.आँक्सिजन, व्हेन्टिलेटर व बेड उपलब्ध न झाल्याने तडफडून आपल्याच स्वकियांचे प्राण जात आहेत. त्यामुळे आतातरी सावध व्हा आणि सुरक्षित रहा काळजी घ्या असेच आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.

      मुळातच कोरोना पासून स्वतः चे कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने कोरोना तपासणी करुन औषधोपचार घेणे आवश्यक आहे. वेळ टळुन गेल्यावर पैसा, संपत्ती ,पद प्रतिष्ठा कोणालाही कोरोना पासून वाचवू शकणार नाही. 

          समाजाला कोरोना पासून वाचवण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग गेले सहामहिने जीव धोक्यात घालून काम करत आहे. यामध्ये खाजगी रुग्णालये तसेच डाँक्टर मोठे योगदान देत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संघटना आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. अशावेळी लोकांनी सुद्धा परिस्थितीची जाणीव ठेवून योगदान देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page