सूर्यकांत जोशी कुडाळ -9421214450
आजच्या शहरी तसेच ग्रामीण भागात एक नवीच जीवनशैली डोकं वर काढताना दिसतेय – हॉटेल, धाबा, फास्टफूड सेंटर किंवा घरपोच पार्सल या “हॉटेलिंग” संस्कृतीची. घरच्या अंगणात, धुरकटलेल्या चुलीवर आई किंवा पत्नीच्या हातचं चविष्ट जेवण खाण्याची परंपरा हळूहळू विस्मृतीत चालली आहे. त्याऐवजी हातात मोबाईल घेऊन “आज काय ऑर्डर करूया?” हा प्रश्न जणू नित्याचा भाग बनलाय.
हॉटेलिंग नक्कीच करावं, तो आता जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. तो सध्याचा एक ट्रेंड झाला आहे.फक्त गरज आहे ते आपण काय खातोय याचा विचार करण्याची. आपण आपल्या हाताने आपल्याच पोटात जे अन्न ढकलणार आहोत त्याचा दर्जा व त्या ठिकाणची स्वच्छता पाहिली पाहिजे. आपल्या शरीर प्रकृतीला काय झेपणार आहे त्याचा विचार केला पाहिजे.गर्दीच्या वेळी तर अशा ठिकाणच्या जेवणाचे तीन तेरा नेहमीच वाजत असतात. कोणता चमचा कशात आणि कच्चे पक्के याचा काही धरबोळ नसतो.
ही बाब आता अनेकांच्या ध्यानात येऊ लागल्याने हा ट्रेंड बदलू पाहत आहे. पंजाबी व चायनीज डिश पेक्षा महाराष्ट्रीयन जेवणाचे त्यातही शाकाहारी जेवणाचे महत्व वाढत आहे.पालेभाज्या व कोशिंबीरी पुन्हा ताटात डोकावून पहात आहेत हॉटेल पेक्षा घरगुती जेवण बनवून घेणे किंवा घरगुती जेवण मागवले जाऊ लागले आहे. मैंदयाच्या रोटीचे परिणाम ध्यानात येऊ लागल्याने भाकरी, पोळीचे महत्व पुन्हा वाढू लागले आहे.
हॉटेलिंग ही केवळ भूक भागवण्याची गोष्ट राहिलेली नाही, तर “स्टेटस” दाखवण्याचं साधन बनलं आहे.काही छोटे मोठे कार्यक्रम असो की घरी पै पाहुणे आलेले असोत, घरात सुग्रास, पौष्टिक, ताजं जेवण सहज उपलब्ध असूनही बाहेरच्या पदार्थांचा मोह आपण का धरतो? महाराष्ट्रीयन पिठलं-भाकरी, आमटी-भात, थालीपीठ, खिचडी यांचा सुगंध विसरून लोकांना “पनीर बटर मसाला, नान आणि मंचुरियन” याशिवाय मेजवानी अपुरीच वाटते! आपल्याच खाद्यसंस्कृतीकडे पाठ फिरवून परकीय चवींचा मोह जणू प्रतिष्ठेचा भाग झाला आहे.
या हॉटेलिंग संस्कृतीमागे आणखी एक कारण पुढे केलं जातं – “घरच्या महिलांना स्वयंपाक व आवरण्याचा त्रास नको.” पण या सोयीच्या नावाखाली आपण नकळत आरोग्याचं नुकसान करून घेतोय. बाहेरचं जेवण तळकट, मसालेदार आणि बहुतेकदा पुन्हा पुन्हा गरम केलेलं असतं. पदार्थांच्या देखाव्यासाठी ते आकर्षक वाटले, तरी त्यांचा पौष्टिकतेशी फारसा संबंध नसतो. यामुळे अपचन, आम्लपित्त, स्थूलता, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचं संकट समाजावर वाढताना दिसतंय.
प्रश्न केवळ पैशांचा नाही. खरं तर “पैसे खर्च करून आपण आपल्याच आरोग्याशी खेळतोय” ही वस्तुस्थिती नजरेआड केली जाते. एका जेवणासाठी शेकडो रुपये खर्च करून जे आरोग्य आपण हरवतो, त्याची किंमत लाखोंनी मोजावी लागते.
आज गरज आहे ती या चुकीच्या सवयीवर कठोर आत्मपरीक्षण करण्याची. घरगुती जेवण हेच खरं औषध आहे. आईच्या हातचं अन्न, मातीच्या भांड्यातल्या भाकरी, घरच्या दह्याचा घमघमाट – यातच खरी ताकद आहे. आपल्याच संस्कृतीत आरोग्याचं, तृप्तीचं आणि चविष्टपणाचं सोनं दडलं आहे.
हॉटेलिंग ही फॅशन नाही, तर आरोग्याची फसगत आहे. त्यामुळे आजच जागं होऊया – भलेही हॉटेल मधील आपल्या थाळीत पुन्हा एकदा घरगुती व महाराष्ट्रीयन जेवणाचा मान वाढवूया. कारण उद्या उशीर झाला, तर पैसा आणि प्रतिष्ठा टिकवता येईल कदाचित, पण हरवलेलं आरोग्य परत मिळणं कठीणच ठरेल.
Yo! 755bet5, eh? Another one to add to the list! Hope it’s not just another flash in the pan. Time to put it to the test. Give it a shot here: 755bet5