

(अजित जगताप)
करहर दि: प्रति पंढरपूर समजणाऱ्या जावळी तालुक्यातील नैसर्गिक वरदान लाभले आहे. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाच्या रस्त्याने स्थानिकांना झळ सोसावी लागत आहे. टोणपेवाडी येथे रस्ता खचला तर पार्टेवाडी मध्ये घरात पाणी शिरल्यामुळे लोकांना रात्रभर जागे राहावे लागले.
सध्या कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस व वादळ वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झालेली आहे काटवली येथील तुकाराम बेलोशी यांचे घर पडले तर जावळी बँकेचे पदाधिकारी असलेल्या चंद्रकांत गावडे यांच्या घराशेजारील टोणपेवाडी येथील निकृष्ट दर्जाचा रस्ता खचला आहे. गेल्या वर्षीच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. आता पावसाळ्यात रस्ताच खचल्यामुळे पुन्हा एकदा ठेकेदारांना ठेका मिळवण्यासाठी अवतान आलेला आहे.
जावळी तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यानंतर माणुसकीच्या भावनेतून मदत केली जात होती. आता निकृष्ट दर्जाचा आणखीन किती रस्ता बनवावा? याची चक्क पाहणी आता काही ठेकेदार खुलेआम करू लागल्यामुळे जावळी तालुक्यात तो एक चांगलाच चर्चेचा विषय झालेला आहे. ठेकेदार कम कार्यकर्ता आणि त्याला लोकप्रतिनिधींच्या पाठिंबा या दृष्ट चक्रामुळे रस्ताच खचला नाही तर गुणवत्ता ही खचली गेली आहे. हे स्थानिकांना उघड्या डोळ्याने पहावी लागत आहे.
पार्टेवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावरून येणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्वी गट क्रमांक ६७१ मधून वाहत होता. मात्र, संबंधित शेतकऱ्याने या नैसर्गिक ओढ्यात भराव टाकून तो बुजवल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. करहर परिसरात चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून शेजारील शेती, रस्ता आणि लक्ष्मण शंकर बिरामणे यांच्या घरामध्ये तळ साचवून गेला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत. पानस फाटा टोणपेवाडी,वहागाव, रांजणी, बेलोशी अशा रिंग रोडच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. गेल्या वेळी वहागाव ते टोणपेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. आता रस्ता खचल्यामुळे दोष कोणाला द्यायचा? चा मार्मिक प्रश्न स्थानिकांनी केला आहे.
मंगळवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे , भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप प्रतापराव परामणे, पिंपरी चे माजी सरपंच प्रमोद शिंदे आणि सलीम आतार यांनी करहर परिसरात भेट देऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. आणखीन किती निकृष्ट दर्जाचा रस्ता करावा? याचाच अंदाज व मोजमाप पाहणी केल्याची टीका होऊ लागलेली आहे. दरम्यान, संबंधितांना तातडीने नुकसान भरपाई करून रस्त्याची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.