Sunday, April 5, 2026
HomeTop Newsसमाजकारणातून राजकीय नेतृत्व घडले तरच समाजाला अभिप्रेत विकास होईल

समाजकारणातून राजकीय नेतृत्व घडले तरच समाजाला अभिप्रेत विकास होईल


सूर्यकांत जोशी कुडाळ

समाजकारण हे राजकारणाचे मुळ आहे.जो नेता समाजकारणातून पुढे येतो तो लोकांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवतो. गावातील पाणी, शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी विविध प्रश्नांची त्याला जाण असते. समाजकार्यामुळे त्याच्यात सेवा वृत्ती, संघटन कौशल्य आणि संवादकौशल्य विकसित होतं.समाजकारणातून पुढे आलेल्या नेतृत्वाबाबत समाजात आपुलकीचे व विश्वासाची भावना असते हे नेतृत्व मौसमी पावसामुळे प्रमाणे भरोशाचे असते तर दुसरीकडे पैशाच्या जीवावर निवडणुकीपुरता पुढे आलेले नेतृत्व हे वळिवच्या पावसाप्रमाणे बे भरोशाचे ठरते. असे नेतृत्व शहरातील आपले नोकरी व्यवसाय सांभाळून मिळालेल्या वेळात गावातील समस्यांच्याकडे लक्ष देत असतात. तर स्थानिक पातळीवर समाजातून पुढे आलेले नेतृत्व त्या समाजाशी एकरूप झालेले असते व ते समाजासाठी पूर्ण वेळ देत असतात

राजकारण म्हणजे सामाजिक कार्याचे फळ

        
               राजकारण म्हणजे सामाजिक कार्याचे फळ असते. समाजासाठी दिलेल्या योगदानाची परीक्षा निवडणुकीच्या माध्यमातून होत असते त्यासाठी मतदारांनी सुद्धा अशा सामाजिक कार्यातून पुढे येणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी कोणताही लोभ अथवा व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता उभे राहील आवश्यक आहे.राजकारणात थेट सत्ता व निर्णयक्षमता असते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला समाजकार्य अधिक नेटाने करण्याची ताकद मिळते.पण जर नेतृत्व फक्त सत्ता मिळवण्यासाठी येत असेल, समाजाची जाणीव नसेल, तर निर्णय लोकहितापेक्षा वैयक्तिक फायद्यासाठी होतात

समाजकारण म्हणजे राजकारणाला जोडणारा पूल


          समाजकारणातून पुढे येणाऱ्या नेत्या विषयी लोकांकडून विश्वासार्हता असते. लोकांना माहीत असतं की “हा नेता आपल्या गावी/समाजात काम केलेला आहे”. त्यामुळे लोक त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात. अशा नेत्याला समाजाच्या प्रश्नाची जाण असल्याने व प्रत्यक्ष अनुभव असल्याने प्रत्यक्ष धोरण ठरवताना शेतकऱ्याचे, कामगाराचे, विद्यार्थ्याचे आयुष्य प्रत्यक्ष पाहिलेला नेता योग्य निर्णय घेतो.दीर्घकालीन नेतृत्व  समाजाशी जोडलेले नेते केवळ निवडणुकीच्या काळापुरते मर्यादित राहत नाहीत; ते सातत्याने काम करत राहतात.
जर समाजकारणाशिवाय नेतृत्व उभे राहिले तर नेते फक्त पैसा व मतांचा खेळ खेळतात आणि लोकहित बाजूला राहतो.त्यांच्या
धोरणांमध्ये स्थैर्य आणि दृष्टीकोनाचा अभाव राहतो.
              समाजकारण हे शाळा आहे आणि राजकारण हे त्याचं विद्यापीठ आहे.खरे, टिकाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्व घडवायचं असेल तर ते समाजकारणाच्या जमिनीवरूनच उभं राहिलं पाहिजे. सर्व सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे वेळप्रसंगी मदतीचा हात दिला पाहिजे दुःखी पिढीचा पाठीशी संघटितपणे समाज उभा केला पाहिजे. स्वतःचे नेतृत्व असे घडवले पाहिजे की लोकांनी स्वतःहून निवडणुकीसाठी अशा नेत्याची निवड केली पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षात झालेल्या आर्थिक व वैचारिक परिवर्तणामुळे सामाजिक कार्यात रस असणारे व्यक्तिमत्व अपवादाणे घडत आहे.

क्षणिक लाभासाठी आपला स्वाभिमान विकू नये –

सोमनाथ काशीळकर ( सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ )

मतदान विकणारे मतदान विकून त्यांच्या मुलांचे भविष्य विकत आहेत. त्यांना ज्या चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या विकत आहेत, त्यांच्या रोजगाराच्या संधी विकत आहेत.भ्रष्टाचार विरहित प्रशासन विकत आहेत.चांगले रस्ते, चांगल्या आरोग्य सुविधा विकत आहेत.शेतीच्या आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सुविधा विकत आहेततत्कालीन फायद्यासाठी स्वतः च्या व कुटुंबाच्या दूरगामी व शाश्वत गोष्टी कडे दुर्लक्ष करून समाजाचे पर्यायाने देशाचे नुकसान करत आहेत.

नागरिकशास्त्रा कडे गांभीर्याने न पाहणे ही सगळ्यात मोठी चूक सध्या लोकशाहीच्या मुळावर आली आहे.यासाठी प्रबोधन करणे ही चांगली गोष्ट आहे. यासाठी सर्वव्यापी पाठींबा मिळाला पाहिजे.विशेषतः युवा वर्ग आणि महिला वर्ग यांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. आपला नेता चारित्र्यसंपन्न असला पाहिजे. आपल्या नेत्याने राजकीय फायदा स्वतःच्या स्वार्था पेक्षा जनहितासाठी करून दिला पाहिजे. अशा नेतृत्वाची निवड करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page