सूर्यकांत जोशी कुडाळ – मार्च महिन्या पासून शासनाने जाहीर केलेल्या लाँकडाऊन मुळे तसेच स्थानिक पातळीवर वेळोवेळी करण्यात आलेल्या बंद मुळे अत्यावश्यक सेवे व्यतीरीक्त असणारे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे कोरोनाने मरण्या ऐवजी आर्थिक चणचणीमुळे निर्माण मानसिक ताणतणावामुळे मरण्याची भिती व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे.
सर्वाधिक भांडवली गुंतवणूक असणारा मंगल कार्यालयाचा व्यवसाय मार्च महिन्या पासून पूर्णपणे ठप्प आहे. अनेक मंगल कार्यालयांवर लाखोरुपयांचा कर्जाचा बोजा आहे. व्यवसायच नसल्याने हप्ते भरणार कोठून हा प्रश्न अनेकांना पडला आहे.त्यामुळे मंगल कार्यालय पूर्ववत सुरु होई पर्यंत मंगल कार्यालयांच्या कर्जाचे हप्ते भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये,कर्जावर व्याज आकारणी करण्यात येऊ नये, कार्यालयांच्या इमारतींचा नगरपालिका / ग्रामपंचायत कर या वर्षी घेण्यात येऊ नये.गेले सहा महिने व्यवसाय बंद असल्याने कोणतेही कर घेण्यात येऊ नये.तसेच वीज बिल आकारणी व्यापारी दराने करण्यात येऊ नये अशी मागणी मंगलकार्यालय व्यवसायिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान मंगल कार्यांच्यावर अवलंबून असणारे अन्य व्यावसायिक सुद्धा आर्थिक संकटात सापडले आहेत. बँण्ड,घोडा,कापड ,भांडी, बूट चप्पल ,हाँटेल पासून अगदी पान टपरी पर्यंतचे सर्व व्यवसायांवर कोरोनामुळे आर्थिक परिणाम झाला आहे. अगदी लग्न सिझन मध्ये लागणारा भाजीपाला शेती मालाच्या विक्री वर परिणाम झाल्याने शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहेत.केवळ व्यवसायांवर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.अन् लाँक नंतर छोट्या व्यावसायिकांना थोडासा आशेचा किरण दिसत आहे. परंतू कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्याने आता बहुतांश ठिकाणी सामाजिक स्तरावर जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे.त्यामुळे छोटे व्यवसायिक पुन्हा धास्तावले आहेत. कोरोनाचे संकट लवकर न संपनारे असल्याने कोरोना सोबत जगण्यासाठी नियमांचे पालन करण्याची सवय जनतेने लावून घेणे आवश्यक आहे.