“शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे,” असा आरोप महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर,नाना भोसले यांनी केला. तसंच दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा शेतकरी संघटना राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
“कोरोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणाऱ्या मोदींनी हमीभावाऐवजी शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे,” असंही भोसले म्हणाले. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुसऱ्या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत असल्याचेही ते म्हणाले.
खत दरवाढ मागे न घेतल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन; कमलाकर भोसले
- Advertisment -