
सूर्यकांत जोशी | कुडाळ, जावली
एकीकडे जगभरात ५ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात असताना, दुसरीकडे जावली तालुक्यातील कुडाळ येथे मात्र पर्यावरणाच्या छाताडावरच घाव घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी व्यावसायिकाला वीज कनेक्शन देण्यासाठी शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वन विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, विकासाच्या नावाखाली अशा प्रकारे वृक्षांची निर्दय कत्तल होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
तोडलेली झाडे थेट नदीपात्रात; पुलालाही धोका
स्थानिकांच्या माहितीनुसार, तोडण्यात आलेली झाडे आणि फांद्या संबंधितांनी थेट नदीपात्रात फेकून दिल्या आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या फांद्या कुडाळ–पानस मार्गावरील कुडाळी नदीच्या पुलामध्ये अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
‘पर्यायी मार्ग न शोधता थेट वृक्षसंहार’
वीज जोडणीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होता का, आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची कोणतीही शहानिशा न करता थेट वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
पिंपळबन उद्यान समितीचे संस्थापक महेश पवार यांनी संबंधित व्यावसायिक तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “पर्यावरण संवर्धनाच्या केवळ घोषणा करून चालणार नाही; प्रत्यक्षात वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले आहे.
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी?
हवामान बदल, अतिवृष्टी, दुष्काळ आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका पाहता पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे विकासकामांच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, ठेकेदार आणि विविध यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
चौकशी होणार का?
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे वन विभाग, महसूल प्रशासन आणि महावितरणची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. या वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? पर्यावरणीय नियमांचे पालन झाले होते का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनानेच द्यायची आहेत. ग्रामस्थांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
