
कुडाळ, : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी २०२६-२७ गाळप हंगामात सहयोगी तत्त्वावर यशस्वीपणे पार पाडणार आहे , अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाला सन 2025 या गळीत हंगामातील उसाची बिले १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी दिली आहे.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहामार्फत कार्यरत होता. मात्र, २०२६-२७ हंगामापासून कारखाना पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेऊन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संचालक मंडळाने नवीन एजन्सीमार्फत जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविल्या होत्या.त्यानुसार, मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जी प्रा. लि., जमखंडी यांनी निविदा सादर केली असून, शेतकरी सभासदांच्या हिताचा विचार करून संबंधित कंपनीशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.मे. गुडगुंटी शुगर्स अँड बायोएनर्जी प्रा. लि., जमखंडीचे मॅनेजिंग डायरेक्टर वीरूपाक्ष गुडगुंटी , चीप अकाउंटंट महालिंग हिरेमठ जनरल मॅनेजर रवींद्र देसाई यांनी प्रतापगड कारखान्याला नुकतीच भेट दिली. या मान्यवरांचे स्वागत प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.
कारखाना सुरू करण्यापूर्वी २०२५-२६ हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाची थकीत बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. ही रक्कम १५ जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे चेअरमन शिंदे यांनी स्पष्ट केले.याबाबत शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता न करता कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, तसेच आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासदांनी एकजुटीने पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.