
कुडाळ, दि. १ : माजी आमदार लालसिंगराव शिंदे तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै. राजेंद्र शिंदे यांच्या घराण्याचा वारसा लाभलेल्या श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनी महिला प्रवर्गातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जावळी तालुक्यासह विशेषतः कुडाळ विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
जावळी तालुक्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन संचालक पदे मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे जावळीच्या वाट्याला येणाऱ्या या दोन जागांमध्ये महिला प्रवर्गातील सुनेत्रा शिंदे यांच्या उमेदवारीला कितपत पाठबळ मिळते, याकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान श्रीमती सुमित्रा शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतः उपस्थित असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे गृहीत धरले जात आहे.
जिल्हा बँकेसाठी यापूर्वी माजी आमदार लालसिंगराव शिंदे व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काही राजेंद्र लालसिंगराव शिंदे यांनी संचालक पद भूषवले होते. त्यानंतर बँकेच्या संचालक पदावर सुनेत्रा शिंदे यांनी सुद्धा आपली मोहर उठवली होती त्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा अनुभव आहे.
सुनेत्रा शिंदे यांना सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले असून जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अनुभव, राजकीय संपर्क आणि जावळीतील संघटनात्मक बांधणी या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, वसंतराव मानकुमरे, माजी सभापती सुहास गिरी,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेच्या संचालक ज्ञानदेव रांजणे जावली शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती सुमित्रा शिंदे यांच्या उमेदवारीची जिल्ह्याच्या राजकारणात सध्याजोरदार चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जावळीला मिळणाऱ्या दोन संचालक पदांपैकी महिला प्रवर्गातील जागेसाठी सुनेत्राताई शिंदे यांची उमेदवारी पुढे आल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता त्यांच्या उमेदवारीला पक्षीय पातळीवर कितपत पाठबळ मिळते आणि निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कोणती समीकरणे आकार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जावळीच्या दोन जागांवरून राजकीय गणिते महत्त्वाची
जावळी तालुक्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन संचालक पदे मिळणार असल्याने या दोन्ही जागांसाठी इच्छुकांची आणि समर्थकांची राजकीय गणिते सुरू झाली आहेत. तालुक्यातील विविध गट, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि स्थानिक राजकीय नेतृत्व यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जावळीच्या राजकारणात महिला नेतृत्वाला पुन्हा एकदा व्यासपीठ मिळाले आहे. आता जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणात जावळीचा वाटा नेमका किती ठरतो आणि सुनेत्रा शिंदे यांच्या उमेदवारीला कोणत्या पातळीवर पाठबळ मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.