
सूर्यकांत जोशी कुडाळ : जावली तालुक्याचे माजी उपसभापती तथा प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी रवींद्र परामणे यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जावली तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या अभ्यासू शेतीतंत्राचा आणि आधुनिक शेतीतील अनुभवाचा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रवींद्र परामणे हे राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्रातही सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांचे तसेच शेती उत्पादनाचे अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन वाढविणे, शेतीतील खर्च कमी करणे आणि उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षम वापर करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.
शेतीतील विविध प्रयोग करताना आलेले अनुभव, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष शेतीतील अडचणींची असलेली जाण यामुळे परामने यांची प्रगतशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर मिळालेली जबाबदारी ही त्यांच्या शेतीविषयक अनुभवाला आणि कार्याला मिळालेली योग्य दखल मानली जात आहे.
आज शेतीसमोर वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, हवामानातील बदल, शेतमालाला मिळणारा बाजारभाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यांसारखी अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव असलेल्या व्यक्तीला किसान मोर्चाच्या प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल, अशी अपेक्षा आहे.
रवींद्र परामाने यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रदेश पातळीवर मांडण्याबरोबरच आधुनिक शेती, नवनवीन तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयुक्त उपक्रमांना चालना मिळेल, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, परामणे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्रीताई गिरी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, माजी सभापती सुहास गिरी,भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे जावली तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रयोगशील वृत्तीचा उपयोग अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
