Friday, April 3, 2026
HomeTop Newsगरीबांच्या मदतीसाठी उभारली ‘माणुसकीची भिंत’ – कुडाळमध्ये अनोखा सामाजिक उपक्रम

गरीबांच्या मदतीसाठी उभारली ‘माणुसकीची भिंत’ – कुडाळमध्ये अनोखा सामाजिक उपक्रम


कुडाळ प्रतिनिधी
समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे, याचे प्रेरणादायी उदाहरण जावली तालुक्यातील कुडाळ येथे पाहायला मिळत आहे. येथील गजराज मित्र मंडळ आणि आपलं पिंपळबन यांच्या संयुक्त विद्यमाने “माणुसकीची भिंत” हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात आला असून, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“नको असेल ते ठेऊन जा… हवे असेल ते घेऊन जा…!” या साध्या पण अर्थपूर्ण संदेशातून उभा राहिलेला हा उपक्रम, गरजू आणि दानशूर यांच्यातील एक भावनिक दुवा बनला आहे. पिंपळबनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही भिंत उभारण्यात आली असून, येथे नागरिक आपल्या घरातील वापरात नसलेल्या पण चांगल्या अवस्थेतील वस्तू ठेवू शकतात.
या वस्तूंमध्ये कपडे, भांडी, शालेय साहित्य, खेळणी किंवा इतर उपयुक्त वस्तूंचा समावेश असू शकतो. गरजू नागरिकांनी कोणतीही लाज न बाळगता, आपल्या गरजेनुसार या वस्तू येथून घेऊन जाव्यात, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात, “माणुसकीची भिंत” हा उपक्रम समाजातील संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची जाणीव करून देतो. नको असलेल्या वस्तूंना नवसंजीवनी मिळत असून, त्याच वस्तू कोणाच्यातरी आयुष्यात आनंदाचे कारण ठरत आहेत.
हा उपक्रम केवळ वस्तूंची देवाणघेवाण नसून, तो “माणुसकीचा उत्सव” ठरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यात सहभागी होऊन, आपला छोटासा वाटा उचलावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🌳 आपलं पिंपळबन, कुडाळ
🚩 गजराज मित्र मंडळ, कुडाळ
– “देणाऱ्याच्या हातात समाधान, आणि घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद… हाच खरा माणुसकीचा धर्म!” 🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page