Monday, June 15, 2026
HomeTop Newsना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; या ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी मिळाला तब्बल 360 कोटींचा...

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; या ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी मिळाला तब्बल 360 कोटींचा निधी

किल्ले अजिंक्यतारा, ताराराणी समाधीच्या सुशोभीकरणासाठी २६८ कोटी
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; ना. अजित पवार यांचा हिरवा कंदील
           मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणालाही मंजुरी
सूर्यकांत जोशी कुडाळ —  ऐतिहासिक राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा, माहुली (सातारा) येथील महाराणी ताराराणी समाधी परिसर आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या तिन्ही स्थळांच्या सुशोभितीकरणाच्या कामाला मंजुरी देत ३५८.८९ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले गेले आहे.
              ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार किल्ले अजिंक्यतारा, माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी परिसर आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वित्त आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.
             बैठकीत राज्यातील या तीन ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या कामांसाठी एकूण ३५८.८९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. माहुली (सातारा) येथील ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी १३३ कोटी रुपये,
किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरणासाठी १३५ कोटी रुपये तर, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ९०.८९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बैठकीदरम्यान या प्रकल्पांच्या आराखड्यांबाबत, सुविधा विकास, सांस्कृतिक वारसा जतन आणि स्थानिक पर्यटनविकासाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
            या निर्णयांमुळे ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यवर्धन, पर्यटनाला चालना, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या तीनही कामांना निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करा, तीनही कामे वेळेत सुरु करा, सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यानिमित्ताने केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page