कुडाळ जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी
– सूर्यकांत जोशी, कुडाळ
जावली तालुका राजकीय वार्तापत्र
—
आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या निवडणुका दृष्टीपथात आल्या असून, जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार का, की प्रत्येक मतदारसंघ व गट गणात स्थानिक पातळीवर स्वतंत्र निर्णय घेतले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला) या वर्गासाठी आरक्षित आहे. या आरक्षणानुसार कुडाळ जिल्हा परिषद गट अध्यक्षपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर जावली पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण पुरुष, तर कुडाळ पंचायत समिती गण सुद्धा सर्वसाधारण आरक्षणात आल्याने या गटाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी प्रभावी दावेदारी लाभली आहे.
—
???? शशिकांत शिंदेंचे आव्हान की शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना नुकतेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न तीव्र होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे जावली तालुका हा आमदार शशिकांत शिंदे यांची मातृभूमी असून, येथेच नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत शिंदे विरुद्ध भोसले अशी प्रतिष्ठेची लढत उभी राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
???? जावलीतील आरक्षणानुसार प्राथमिक स्थिती
जावली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट पुढीलप्रमाणे —
कुडाळ गट: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
म्हसवे गट: नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
कुसुंबी गट: सर्वसाधारण महिला
तर पंचायत समितीचे सहा गण पुढीलप्रमाणे आहेत —
कुडाळ व खर्शी बारामुरे गण (सर्वसाधारण पुरुष),
म्हसवे गण (सर्वसाधारण महिला),
सायगाव गण (सर्वसाधारण महिला),
आंबेघर तर्फ मेढा गण (मागास प्रवर्ग पुरुष),
कुसुम्बी गण ( सर्वसाधारण महिला).
—
???? कुडाळ गटात महिला नेत्यांचा प्रभाव
कुडाळ गटातून माजी सभापती जयश्रीताई गिरी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शोभाताई बारटक्के या प्रमुख दावेदार आहेत. विरोधी पक्षातून तुल्यबळ उमेदवार उभा राहतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण असल्याने प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, तसेच मच्छिंद्र मुळीक, हेमंत शिंदे, मालोजीराव शिंदे यांची नावेही चर्चेत आहेत.
—
???? म्हसवे गटात ओबीसींच्या राजकीय चाचण्या
म्हसवे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) आरक्षित असल्याने ओबीसी वर्गातील इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. या गटात आमदार शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव हुमगाव येते. विधानसभा निवडणुकीत या भागात भाजपा विरोधी मतदान झाल्याने हा गट सत्ताधाऱ्यांसाठी सोपा नाही.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या संभाव्य उमेदवारीवरही चर्चा रंगली असून, मानकोम्बरे यांच्याकडे कुणबी मराठा दाखला उपलब्ध असल्याची चर्चा आहे त्यामुळे ओबीसी मधून ते निवडणूक लढवू शकतात परंतु ते जिल्ह्यात रमणार की राज्य पातळीवर वर्णी लावतात, हे पाहणे रंजक ठरेल.
पंचायत समितीचा खर्शी बारामुरे गण सर्वसाधारण पुरुष आरक्षणात असून, या गणातून सभापती पदासाठी भाजपचे माजी उपसभापती हनमंत पार्टे, दत्ता गावडे, समाधान पोफळे, नितीन गावडे आदींची नावे समोर येत आहेत.
—
???? कुसुंबी गटात महिला उमेदवारांची चुरस
कुसुंबी गट सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने अनेक महिला सक्रिय आहेत. यात माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणी, निर्मला दुधाने, भाजप महिला तालुकाध्यक्ष गीता लोखंडे यांची नावे चर्चेत आहेत.
—
???? महायुती की आघाडी – निर्णायक प्रश्न
ही प्राथमिक स्थिती असली तरी सर्वांचे लक्ष आता नेत्यांच्या अंतिम निर्णयाकडे आहे.
जर महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढत झाली, तर जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि मतदारसंघनिहाय प्रबळ पक्षनिष्ठा या सगळ्यांचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.भाजप सध्या तालुक्यात प्रभावी स्थितीत असला, तरी शिवसेना(एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष यांची भूमिका देखील निर्णायक ठरेल.आगामी काही दिवसांत या सगळ्या राजकीय समीकरणांवर जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत राहणार असून, जावली तालुक्यातील निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित दिसते.
