????
सूर्यकांत जोशी कुडाळ – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. गट-गणांची रचना, मतदार यादीचा कार्यक्रम, आरक्षण सोडत तसेच मतदान केंद्रांची वाढीव संख्या अशा सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्याही हालचालींना वेग आला आहे.
प्रशासनाने जिल्ह्यातील ६५ गट आणि १३० गणांचा प्रारुप आराखडा जाहीर केला असून त्यावर नागरिकांना हरकती-सूचना नोंदविण्याची संधी दिली आहे. विभागीय आयुक्तांच्या सुनावणीनंतर अंतिम आराखडा जाहीर केला जाणार आहे.
याचबरोबर मतदार नोंदणी प्रक्रियाही वेगाने सुरू असून, ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार आहे. त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असून, २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आरक्षण सोडत. प्रशासनाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या अधिसूचनेवर १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
यावेळी मतदान व्यवस्थेतही मोठा बदल दिसून येणार आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढवून ३,२८० केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील मतदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी ही वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, “नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत तपासून घ्यावीत, गट-गण रचनेबाबत व आरक्षण प्रक्रियेबाबत शंका असल्यास वेळेत हरकती नोंदवाव्यात,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यामुळे सातारा जिल्ह्यातील लोकशाही पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या काही दिवसांत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार हे निश्चित आहे.