Thursday, February 19, 2026
Homeसामाजिकसामान्य माणूस निवडणूक लढवण्याचे विसरला स्वप्न.  *ज्याच्या हाती पैसा तोच नेता *  याला जबाबदार कोण? नेता की...

सामान्य माणूस निवडणूक लढवण्याचे विसरला स्वप्न.  *ज्याच्या हाती पैसा तोच नेता *  याला जबाबदार कोण? नेता की सामान्य माणूस…..!         हॅलो मी कार्यकर्ता बोलतोय – लेखमाला

सूर्यकांत जोशी कुडाळ – स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी सत्तेला कंटाळून या गुलामगिरीच्या जोखाडातून बाहेर पडण्यासाठी भारतीय जनतेने लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक देश प्रेमीनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत देश स्वतंत्र झाला देशाने लोकशाही स्वीकारली. लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असा त्याचा अर्थ आहे. त्याकाळी समाजकारणातून राजकारणात नेतृत्व घडत होते. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकारण केले. राजकीय पक्ष सुद्धा त्या कार्यकर्त्याचे सामाजिक कार्य पाहून त्याच्या उमेदवारीचा विचार करत होते.लोक सुद्धा अशा समाजाभिमुख कार्य करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देत होते. त्याकाळी जनतेला नेतृत्वाकडून फक्त शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांच्या अपेक्षा होती. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ त्या उमेदवाराच्या प्रेमा खातर प्रसंगी पदरमोड करून प्रचारात भाग घेतला जात होता. प्रचाराच्या गाडीत चिरमुऱ्याचे पोत असलं की दिवसभराचा प्रचार अगदी  मजेत होत होता. त्या काळात नोकऱ्यांना मर्यादा होत्या. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या मुलाला छोटी -मोठी नोकरी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्याला होती.

             परंतु जसजशी आर्थिक सुबत्ता येऊ लागली तशी वैचारिक पातळीचे घसरण होऊ लागली.1990 च्या दशकापासून एकूणच राजकीय व सामाजिक वैचारिक आणि आर्थिक परिस्थितीत अमुलाग्र बदल झाला. निष्ठेपेक्षा पैशाला महत्त्व प्राप्त होऊ लागले. निवडणुकीत उमेदवाराचे मूल्यमापन त्याच्या सामाजिक कार्य ऐवजी त्याच्या आर्थिक परिस्थितीवर होऊ लागले. गाव पुढाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून राजकारणावर वर्चस्व मिळवण्याचे शक्कल लढवली जाऊ लागली. काही मतदार वर्गाला पैसेवाल्या उमेदवाराच्या कडून मिळणाऱ्या रोख रक्कम,जेवणावळी,दारू इत्यादी चंगळवादी आमिशांची अपेक्षा वाढू लागली. लोकशाहीची अनमोल मूल्ये मूठभर पैसेवाल्यांच्या हाती गहाण पडली. आज गाव पातळी पासून देशपातळीपर्यंत कोणतीही निवडणूक म्हटलं की ठराविक नावांचा विचार केला जातो आणि तेच तेच उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय राजकारणात पुढे येताना दिसतात. समाजाप्रती आदर असणारे आणि समाजासाठी झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते मात्र या निवडणूक प्रक्रियेपासून चार हात लांब गेले.  मग एकच प्रश्न उठतो आजच्या या राजकीय परिस्थितीला जबाबदार कोण.

या प्रश्ना बाबत सामाजिक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून ही लेखमाला सुरु करत आहे. याबाबतचे आपले मत 9421214450 या वॉट्सअप नंबर वर जरूर कळवावे


सामान्य, शेतकरी, कष्टकरी माणसांच्या मनात निवडणूक  लढविण्याची भीती का बरे निर्माण झाली आणि जबाबदार नक्की कोण? –   विलासबाबा जवळ
   जावळी शुरांचा -विरांचा आणि शेतकरी,कष्टकर्‍यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. दोन-तीन धरणे आणि एक साखर कारखाना असूनही बोटावर मोजण्याइतक्याच गावातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पोहचले. नाहितर धरण ऊशाला कोरड घशाला हिच अवस्था ऐन उन्हाळ्यात अनेक गावात अजूनही पहायला मिळते. माथाडी कामगार आणि टॅक्सी मालक-चालक,कलर काम या क्षेत्रात मुंबई मध्ये किमान ६० ते ७० टक्के लोक या तालुक्यातील कार्यरत असावी. ना एम.आय. डी.सी., ना मोठे उद्योग धंदे त्यामुळे इथल्या युवकाला पुणे-मुंबई शिवाय पर्याय नाही. महिलांच्या हाताला शेती शिवाय काम नाही. याचाच अर्थ अजूनही ७०ते ८० टक्के जावळीकर सामान्यपणे जीवन जगत आहे.


     अशा या तालुक्यात १९९५ पुर्वीच्या निवडणूका सामान्यपणे आणि सामान्य माणसांकडून लढवल्या जात होत्या. त्याचा खर्चही फार कमी होता. लोक घरची भाकरी बांधुन प्रचार करीत होती.
मा.सदाशिव भाऊ सपकाळ यांची निवडणूक तर सामान्य  लोकांनी शे-पाचशे रूपये देवून लढविली होती नव्हे तर जिंकून दाखविली होती. सदाभाऊंच्या काळातच सौ.सुभद्रा जाधव, श्री सदाशिव टिळेकर अशा सामान्य व कष्टकरी लोकांनी पंचायत समितीची पदे भूषविली होती.   साधारण १९९९ पासुन ही परिस्थिती बदलली. मुंबईस्थित भांडवलदार मंडळी राजकारणात उतरली आणि राजकारणाची दिशाच बदलली. ईथुन पुढच्या सर्व निवडणूका म्हणजे चंगळवाद बनत गेला. गावागावातील चार-दोन गावटगे हाताशी धरून निवडणूक काळात त्यांचे खिशे गरम करून आणि गावागावात मटणाच्या जेवणावळींच्या पगंती झडू लागल्या.


सुरवातीला काही जेष्ठ कार्यकर्त्यांना होणार्‍या लक्ष्मी लाभाने आनंदाच्या उकळ्याही फुटल्या पण त्यांना त्यावेळी हे माहित नव्हते आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो आहोत.अनेक वर्षे ज्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसाठी चपला झिजविल्या, सतरंज्या उचलल्या त्या कार्यकर्त्यांना मात्र आता पश्चाताप होताना दिसत आहे. कारण तुम्ही पक्षासाठी,नेत्यासाठी कितीही कस्ताखाल्ल्या असल्या तरीही कोणत्याही निवडणूकीची उमेदवारी देतावेळी तुमची निष्ठा,अथवा अनेक वर्ष केलेले काम पाहिले जात नसुन तुमच्याकडे निवडणूकीत खर्च करण्यासाठी किती माया आहे हेच विचारले जाते आहे. तुमचं समाजासाठी अथवा पक्षासाठी कितीही योगदान असले तरीही ज्याचा निवडणूकीपूर्वी समाजाशी आणि सामाजिक कार्यासी काडीमात्र संबध नसतो असा भांडवलदार-उद्योजकच पैसा या निकषावर तुमच्या बोकांडीवर बसविला जातो. पक्षाच्या नेत्यांनी दिलेला उमेदवार म्हणून आपणही त्या उमेदवाराला निवडून देतो.


     अलीकडच्या काळात प्रचारा दरम्यान अनेक ढाब्यावर जेवणासाठी झुंबड उडत आहेत. विशेष म्हणजे या गर्दित आता महिलाही दिसु लागल्या आहेत. घराला पुढे नेणारी सुसंस्कृत आईच जर ढाब्यावर जेवायला जावू लागली तर समाजाचा विनाश अटळ आहे हे निश्चित. प्रचारा दरम्यान गावागावात दारू पोहचविण्याची व्यवस्थाही केली जात आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेत अडकविण्याचे पाप ही राजकिय मंडळी करित असून सामान्य माणसाची कुटुंब व्यवस्थाच उध्वस्त करण्याचे षडयंत्र भांडवलदार मंडळी करीत आहेत.
  एका बाजुला भांडवलशाही आणि दुसर्‍या बाजुला घराणेशाही अशा दुहेरी कात्रीत सामान्य माणूस अडकला आहे. घराणेशाही म्हणजे पहिला बाप नंतर पोरगा नंतर नातु किंवा पहिला नवरा नंतर बायको नंतर पोरगा या चक्रव्युहातुन सामान्य माणूस आणि कार्यकर्ता मात्र नेहमीच पदापासून वंचीत रहाणार आहे. पण या सर्व परस्थितीला जबाबदार कोण?


जावळीकरांनो करा निर्धार..!


ज्याच्या जवळ पैसा आहे तो प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्न करणारच. पण सामान्य कार्यकर्ता आणि मतदारांनी विचार करायला हवा. निवडणूक काळात मिळणार्‍या हजार-पाचशे रूपये व दोन-चार वेळच्या जेवणावळी या मुळे या निवडणूक प्रक्रियेतुन सामान्य माणूसच सामान्य माणसाला उध्वस्त करीत आहे. भांडवलदार उमेदवाराला उमेदवारी दिल्यावर विचारा तुमच्या नेत्याला याच्या अगोदरचे समाजासाठी याचे योगदान काय आहे. ठरवा  प्रत्येक घरातील शेतकरी,कष्टकरी कुटुंब प्रमुखाने, निर्धार करा, यापुढे निवडणूकीतील पैसा आणि जेवणावळी मी आणि माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती घेणार नाही.
असा विचार केला तरच आगामी काळात सामान्य माणूस या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून दिसेल.


बिन पैशाची निवडणूक सदाभाऊ सपकाळ, बच्चु कडू, राजु शेट्टी लढवू शकतात जिंकू शकतात तरं मग जावळी तालुक्यातील सामान्य कष्टकरी, शेतकरी यांच्या घरातील युवक जिंकु शकणार नाहीत का ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page