Sunday, May 31, 2026
Homeराजकीयजावलीत कमळाबाईच्या घरात धुसफूस : राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ

जावलीत कमळाबाईच्या घरात धुसफूस : राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ

सूर्यकांत जोशी कुडाळ – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे मजबूत पकड आहे. असे असतानाच भाजपा अंतर्गत  गटात राजकीय वर्चस्वाची चढाओढ  असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी चढाओढ  गावा गावात गटात गणात  असल्याचे दिसून येते.

                हल्ली राजकारण हा विषयच असा झालाय की राजकारणाविषयी चर्चा केल्याशिवाय दिवस सुफळ जात नाही. मग तो नेता,कार्यकर्ता, मतदार असो की सामान्य माणूस, वयोवृद्ध असो की युवा प्रत्येक जण राजकारणातील चालू घडामोडी वर आपल्या आपापल्या पद्धतीने त्यावर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी घर,पहार, चावडी, काही कार्यक्रम, सभा चार चौघे एकत्र जमल्यानंतर इतर गप्पागोष्टी पेक्षा  राजकारणाची चर्चा चांगलीच रंगते. प्रत्येक जण अशा चर्चेत आपापले वैचारिक रंग भरत असतो.

         सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीपथात आल्याने राजकीय रंगांची उधळण होताना दिसते. जावळी तालुक्याने आजपर्यंत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी  आणि आता भाजप  असे अनेक सत्तांतरे पाहिली आणि केली. जावलीतील जनता आजपर्यंत सत्ते सोबत राहिली आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींसोबत असणारे कार्यकर्ते पाहिले तर ते जात्या वेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे त्या त्या लोकप्रतिनिधीं सोबत आजही आपली राजकीय निष्ठा प्रवाहित करत गेले आहेत. जावली तालुक्यात सध्या नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे पक्ष एक असला तरी गावात गटात आणि गणात असणाऱ्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू  आहे.

              गेल्या महिनाभरात ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महू व हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीच्या वतीने आंदोलनाची हवा भरून  म्हसवे  व  कुडाळ गटातील कार्यकर्त्यांना चार्ज केले. दररोज गावोगाव बैठकांचे सत्र सुरू झाले कार्यकर्ते संघटित केले गेले. त्याचवेळी या प्रक्रियेपासून काही वरिष्ठ कार्यकर्ते अलिप्त राहिले. पुढे नियोजनानुसार नामदार शिवेंद्र सिंह राजांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित झाले.

              त्यानंतर काही दिवसातच जावली पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे वारकरी सांप्रदायाच्या वतीने नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जरी संप्रदायिक असला तरीही त्याला राजकीय झालर होती अशी चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे   यांनी मोर्चे बांधणी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाचे पूर्व मंडलाध्यक्ष संदीप परामणे दोन्ही गटांना समजावून घेत आपली जबाबदारी अत्यंत हुशारीने सांभाळत आहेत.

    अशीच राजकीय चढाओढ म्हसवे आणि मेढा गटात सुद्धा भाजपा अंतर्गतच दोन गटात असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. असे असले तरी हे भाजपच्या पेल्यातील वादळ आहे आणि ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नक्कीच थोपवू शकतात.

              जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटात प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी   कारखान्याच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जनसंपर्क वाढवून कुडाळ गटावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे . या गटात जावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे हे सुद्धा आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी चर्चा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण  सोडत झाली आहे. आता गट व गणांच्या आरक्षण सोडतकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसात  कोणत्याही क्षणी या निवडणुकीच्या आधी सूचना जारी होणार आहे.

                 जावली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय हालचालींना वेग आला असला तरी ही निवडणूक सातारा जिल्ह्यात महायुती म्हणून लढली जाणार की स्वतंत्र लढली जाणार हे गुलदस्त्यात आहे.महायुतीतील घटक पक्ष असणारी शिवसेना( एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार), रिपब्लिकन पक्ष  हे पक्ष अजून तरी सुप्त अवस्थेत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही व्यासपीठावर दिसून येत नाहीत. बॅनर वर या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे फोटो दिसत नाहीत.

         सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदा साठी obc आरक्षण आहे. त्यामुळे या पदासाठी जावली तालुक्यातून माजी सभापती जयश्री गिरी यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाले आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन गिरी दाम्पत्यांच्या वतीने कुडाळ येथे करून सौरभ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.हा  कार्यक्रम सांप्रदायिक असल्याने या कार्यक्रमाच्या बॅनर वरती पक्षातील स्थानिक नेतृत्वांचे फोटो नसावेत. तरी सुद्धा त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलेच .

       जावळी तालुक्याच्या राजकारणावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे माध्यमातून भारतीय जनता पक्ष्याचे निर्विवाद वर्चस्वआहे. आमदार शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादी पक्ष सक्रिय होईल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कार समारंभ व्यतिरिक्त भाजपा विरोधी आघाडी कडून अजून कोणत्याही राजकीय हालचाली फारशा दिसून येत नाहीत. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी अजून कोणतीही राजकीय हालचाल सुरु केली नाही. कदाचित गट व गणाच्या आरक्षण सोडतीची ते प्रतीक्षा करत असावेत.तूर्तास तरी भाजपा अंतर्गतच दोन गटात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page