सहकारातील दिपस्तंभ – स्व. लालसिंगराव शिंदे काका


सूर्यकांत जोशी कुडाळ – सहकार महर्षी माजी आमदार लालसिंगराव शिंदे काका यांनी जावली तालुक्याच्या सामाजिक विकासासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. स्व. काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र राजेंद्र शिंदे यांनी या संस्थांना सक्षम करण्याचे काम केले. त्यानंतर सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून या संस्थांच्या प्रगतीची घोडदौड सुरु आहे.माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे यांच्या 98 वी जयंती दि.26 जानेवारी रोजी संपन्न होत आहे निमित्त शिंदे कुटुंबियांनी जावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदाना बाबत घेतलेला आढावा.
सहकारी संस्था या नेतृत्वाच्या विश्वासावर उभ्या असतात. आणि ती विश्वासार्हता या घराण्याने जपली आहे.जावली तालुका खरेदी विक्री संघ, कै. लालसिंगराव बापुसो शिंदे सहकारी पतसंस्था व प्रतापगड सहकारी साखर कारखाना या तिन्ही संस्था आज सक्षम पणे उभ्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील सामान्य कुटुंबातील शेकडो हातांना काम मिळत आहे. सहकार टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी नेतृत्वाला नेहमीच सतर्क रहावे लागत असतें. एखाद्या कार्यकर्त्याच्या चुकीचा परिणाम त्या संस्थेच्या आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर परिणाम करत असतो. त्यामुळे संस्थांचे सभासद आणि कार्यकर्त्यांचीही तितकीच जबाबदारी असतें.
तालुक्यात अनेक नेत्यांनी सहकारी संस्था काढल्या परंतु त्यातील किती बुडाल्या आणि अस्तित्वात असणाऱ्या संस्थांची अवस्था काय आहे. तालुक्यातील अगदी मोजक्याच सहकारी संस्था प्रगती पथावर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने स्व. लालसिंगराव शिंदे यांनी काढलेल्या सहकारी संस्थांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल. या संस्थांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबाना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर सर्वासामान्य जनतेच्या आर्थिक अडचणी प्रसंगी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करत आहेत.
माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांचे व्यक्तिमत्व राजकारणाच्या दलदलीत कमळाच्या फुलाप्रमाणे उठून दिसत होते.निष्कलंक चारित्र्याचा नेता म्हणून काकांची ख्याती होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही अनेकदा कुडाळ गाव सांगितले की ते लालसिंगराव काकांचे गाव का असा आदबीने समोरचा व्यक्ती चौकशी करतो. आणि हाच वारसा जपण्याची जबाबदारी आज सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून काकांच्या तिसऱ्या पिढीवर आहे.
स्व. काकांच्या या चारित्र्य संपन्नतेचा सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर आदर युक्त प्रभाव होता.म्हणूनच महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार असताना सुद्धा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शरद पवार यांचे काकांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.पुढे शरद पवार साहेब आणि अजित दादांनी सुद्धा काकांच्या पश्चच्यात त्यांच्या कुटुंबावर नेहमीच लक्ष ठेवले. आजही सौरभ शिंदे यांना या दोन्ही नेत्यांचे पाठबळ लाभत आहे.
आताच्या परिस्थितीत जावली तालुका खरेदी विक्री संघ आणि लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्था स्वबळावर दिमाखात उभ्या आहेत. प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिक, नैसर्गिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आपली वाटचाल करत आहे. या कारखान्याला आता आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंची भक्कम साथ लाभली आहे.
आ. बाबाराजें व चेअरमन सौरभ बाबा पर्वाची दमदार सुरुवात
यावर्षी अजिंक्य तारा -प्रतापगड उद्योग समुहाच्या माध्यमातून गळीत हंगाम यशस्वी वाटचाल करत आहे.माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांची अगम्य इच्छा शक्ती आणि संस्थापक चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंह राजें तथा बाबाराजें व प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे पर्वाची कारखान्या सोबतच जावलीच्या राजकारणात दमदार सुरुवात झाली आहे. यावर्षी अजिंक्यतारा व प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या माध्यमातून पहिला गळीत हंगामात उत्पादित दोन लाख साखर पोत्यांचे पूजन जावळीचे सहकार महर्षी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात येत आहे.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना आणि महू हातगेघर धरणाचे काम 1998 साली एकाच वेळी सुरू झाले. श्रेय वाद आणि राजकीय इच्छा शक्ती अभावी धरणाचे काम अजूनही पूर्ण होऊ शकले नाही असे जनतेचे ठाम मत आहे. जावली तालुक्याच्या कुडाळ विभागाला वरदान ठरणारे हे दोन्ही प्रकल्प वेगाने पूर्ण होतील असे चित्र दिसत होते. माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वर्गीय चेअरमन राजेंद्र शिंदे यांची जिद्द यामुळे प्रतापगड सहकारी साखर कारखाना अत्यल्प वेळेत उभा राहिला. कारखाना उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आवश्यक असणारे भाग भांडवल उभे केले. प्रतापगड कारखान्याचा चाचणी गणित हंगाम आणि पहिला गळीत हंगाम यशस्वी रित्या पूर्ण झाला. परंतु लोकरी माव्यासारखे नैसर्गिक संकट आणि पुढे आर्थिक अडचणी यामुळे कारखान्याचे चाक काहीसे थांबले.
प्रतापगड कारखान्याला सुरुवातीपासूनच अनेक धक्के बसले. नैसर्गिक आर्थिक संकटांना तोंड देत असतानाच प्रतापगड कारखाना उभारणीचे स्वप्न पाहणारे माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांचे दुःखद निधन झाले. हा धक्का कार्यकर्ते पचवत असतानाच कारखाना, कामगार व सभासदांचे हित ध्यानात घेऊन तत्कालीन चेअरमन राजेंद्र शिंदे व संचालक मंडळाने हा प्रकल्प गोदावरी शुगर मिलला भागीदारी तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. या भांडवलदार कंपनीने मोठ्या धाडसाने हा कारखाना यशस्वी चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी मात्र ऊस देण्याच्या बाबतीत दुय्यम भूमिका ठेवली. याला काही राजकीय कंगोरा सुद्धा आहे.
गोदावरी शुगर मिलच्या माध्यमातून कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू असतानाच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे लढवय्या चेअरमन राजेंद्र शिंदे यांनाही आजाराने गाठले. एकीकडे प्रतापगड कारखाना उभारण्याचे लढाई जिंकली असतानाच त्यांना शारीरिक आजारापुढे मात्र हार पत्करावी लागली. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला ‘ अशीच परिस्थिती निर्माण झाली. आणि शिंदे परिवाराबरोबरच त्यांच्या चाहत्यांना हा दुसरा मोठा धक्का बसला.
आपल्या स्वतःच्या कुटुंबाला सावरत असतानाच चेअरमन सुनेत्रा शिंदे यांनीही प्रतापगड कारखान्याचा परिवार सांभाळण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्यावेळच्या आर्थिक अडचणी ध्यानात घेऊन त्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला भागीदारी तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने तीन वर्षे हा कारखाना चांगला चालवला. पुढे उसाची उपलब्धता पाहून त्यांनी प्रतापगड कारखान्याची काडीमोड केला. त्यानंतर प्रतापगड कारखाना सहकारात राहणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेरच्या क्षणी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी मदतीचा हात दिला आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवण्यासाठी आला. परंतु दुर्दैवाने प्रतापगड कारखान्याला वाचवण्यासाठी हात देणारा किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत बुडू लागला. त्यामुळे प्रतापगड सहकारी साखर कारखान्या पुढे नवीन संकट उभे राहिले.
पुढे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे धुरा युवा नेतृत्व सौरभ शिंदे बाबा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. कारखाना सुरू व्हावा यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी समन्वय साधून हा कारखाना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालवला जावा यासाठी प्रयत्न केले. चेअरमन सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवण्याचा निर्णय घेतला. प्रतापगड कारखाना बंद राहिल्याने गेल्या काही वर्षात जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली होती. आता आपल्या हक्काचा हा कारखाना सुरळीत चालवणे ही केवळ आमदारांची किंवा प्रतापगड कारखाना संचालक मंडळाची जबाबदारी नसून तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे हे ओळखून शेतकरी सहकार्य करत आहेत.
अजिंक्यतारा – प्रतापगड पर्व जावळीच्या राजकारणाला विशेषतः कुडाळ गटातील राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे. दिवसेंदिवस प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांची लोकप्रियता वाढत आहे. आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांची मोलाची साथ व मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. अनुभवातून आलेली राजकीय प्रगल्भता, जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचे व नव्या युवा पिढीतील कार्यकर्त्यांचे सुयोग्य संघटन सौरभ बाबा करत आहेत.त्यामुळे कुडाळ गटावर सौरभ शिंदे यांची पकड अधिक मजबूत होत चालली आहे.
सौरभबाबा जावळीचे आमदार होणार कार्यकर्त्यांना विश्वास –
आज सातारा जावली विधानसभा मतदार संघात विद्यमान आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांची मजबूत पकड आहे. गेल्या दहा वर्षात बाबाराजेंनी जावळीतील जनतेला प्रेम व विश्वास दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सातारा जावली मतदार संघ आहे तोपर्यंत आमदार बाबाराजेच राहणार परंतु भविष्यात जावली मतदार संघ स्वतंत्र होईल तेव्हा सौरभ शिंदेच जावळीचे आमदार होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
